हनुमान चालिसा कधी लिहिली गेली ? हे ठाऊक आहे का ?
सर्वजण पवनपुत्र हनुमानाची पूजा करतात आणि ‘हनुमान चालिसा’ही पाठ करतात; पण ती केव्हा लिहिली ? कुठे आणि कशी लिहिली गेली ? हे कदाचित् काही लोकांनाच ठाऊक असेल.
१. अकबराने बिरबलाला संत तुलसीदास यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करणे
इ.स. १६०० ची गोष्ट आहे. हा काळ सम्राट अकबर आणि संत तुलसीदास यांचा होता. एकदा संत तुलसीदास मथुरेला जात होते. रात्र होण्यापूर्वी त्यांनी आगरा येथे मुक्काम केला, लोकांना कळले की, संत तुलसीदास आगरा येथे आले आहेत. हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली. सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की, हा तुलसीदास कोण आहे ? तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की, त्यांनी ‘रामचरितमानस’चा अनुवाद केला आहे. हे रामभक्त तुलसीदासजी आहेत. मीही त्यांना पाहून आलो आहे. त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे. अकबरालाही त्यांना भेटण्याची इच्छा झाली आणि ‘मलाही त्यांना भेटायचे आहे’, असे सांगितले.
२. संत तुलसीदास यांनी अकबराला भेटण्यास नकार दिल्यावर अकबराने त्यांना साखळदंडाने बांधण्याची आज्ञा देणे
सम्राट अकबराने त्याच्या सैनिकांची एक तुकडी संत तुलसीदास यांच्याकडे पाठवली आणि त्यांनी संत तुलसीदासांना सम्राटाचा निरोप दिला की, तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित रहा. हा संदेश ऐकून संत तुलसीदास म्हणाले, ‘‘मी प्रभु श्रीरामाचा भक्त आहे. माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध ?’’ त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला. हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोचल्यावर त्याला फार राग आला आणि त्याने संत तुलसीदास यांना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला. बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला; पण अकबराला ते मान्य नव्हते आणि त्याने संत तुलसीदास यांना साखळदंडांनी बांधून आणण्याची आज्ञा केली.
३. संत तुलसीदास यांनी चमत्कार न दाखवल्याने अकबराने त्यांना कारागृहात ठेवणे
संत तुलसीदास यांना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले. तेव्हा अकबर म्हणाला, ‘‘तुम्ही चमत्कार करणारी व्यक्ती आहात. थोडा चमत्कार दाखवा आणि सुटका करा.’’ संत तुलसीदास म्हणाले, ‘‘मी केवळ भगवान श्रीरामाचा भक्त आहे, जादूगार नाही की, जो तुम्हाला काही चमत्कार दाखवू शकेल.’’ हे ऐकून अकबर संतापला आणि त्यांना बेड्या ठोकून फतेपूर सिक्री येथील अंधारकोठडीत टाकण्याचा आदेश दिला.
४. संत तुलसीदास यांना कारागृहात ठेवल्यावर शेकडो वानरांनी लाल किल्ल्यावर आक्रमण करणे
दुसर्या दिवशी शेकडो वानरांनी आगर्याच्या लाल किल्ल्यावर आक्रमण करून नासधूस केली. लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता. यानंतर मग अकबराने बिरबलला बोलावून विचारले, ‘‘बिरबल काय चालले आहे ?’’ तेव्हा बिरबल म्हणाला, ‘‘महाराज, मी तुम्हाला आधीच सावध केले होते; पण तुम्ही ऐकले नाही आणि हा चमत्कार झाला.’’
५. संत तुलसीदास यांनी कारागृहात हनुमान चालिसा लिहिणे आणि अकबराने त्यांना आदरपूर्वक सोडणे
अकबराने संत तुलसीदास यांना तात्काळ अंधारकोठडीतून बाहेर काढले आणि त्यांच्या साखळ्या उघडल्या गेल्या. संत तुलसीदास बिरबलाला म्हणाले, ‘‘मी अपराध केला नसतांना मला शिक्षा झाली आहे. मला अंधारकोठडीत भगवान श्रीराम आणि हनुमान यांची आठवण झाली. मी रडत होतो आणि रडत असतांना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहित होते. हे ती हनुमान चालिसा की, जी मी हनुमानाच्या प्रेरणेने लिहिली आहे, ज्याप्रमाणे हनुमानाने मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून साहाय्य केले आहे, त्याप्रमाणे जो कुणी संकटात सापडला आहे आणि त्याने ही हनुमान चालिसा म्हटली, तर त्याचे दुःख अन् सर्व संकटे दूर होतील.’’ अकबरला पुष्कळ लाज वाटली आणि त्याने संत तुलसीदास यांची क्षमा मागितली अन् त्यांना पूर्ण आदरपूर्वक आणि संरक्षण देऊन मथुरेला पाठवले.
(साभार : सामाजिक माध्यम)