रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपासाठी बसलेली असतांना साधिकेला आलेली अनुभूती
‘३०.१.२०२२ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करत असतांना माझे लक्ष पंचमुखी हनुमंताच्या मूर्तीकडे जात होते. ‘प्रत्यक्ष हनुमंत तिथे असून मी त्याच्याशी बोलायला हवे’, असे मला वाटले आणि मी त्याच्याशी बोलायला आरंभ केला. त्या वेळी आपोआप माझ्याकडून पुढीलप्रमाणे प्रार्थना होऊ लागल्या.
१. प्रार्थना
अ. ‘हे हनुमंता, रामदूता, तू प्रभु श्रीरामांच्या चरणी अखंड शरणागत राहिल्यामुळे जसे प्रभु नित्य तुझ्या अंतरी विराजमान झाले, तसे आम्हा सर्व साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरणागत रहाता येऊ दे.’
आ. ‘जसे तू सीतामातेच्या शोधार्थ निश्चय करून अगदी रावणाच्या लंकेपर्यंत गेलास, तसे आम्हाला श्री गुरूंच्या कार्यात निश्चयाने प्रयत्नरत राहून ध्येयप्राप्ती करण्यासाठी बळ दे.’
इ. ‘हे रामदूता, तू रावणाच्या लंकेत जाऊन ज्या चपळाईने, सतर्कतेने, समयसूचकतेने आणि धिराने प्रभूंनी सोपवलेले सीतामाईला शोधण्याचे कार्य उत्कृष्ट प्रकारे करून प्रभूंचे मन जिंकलेस, तसे गुण आमच्यामध्येही वृद्धींगत होऊन आम्हालाही श्री गुरूंचे मन जिंकता येऊ दे.’
ई. ‘लंकेला जाऊन केवळ सीतामाईला शोधणे’ एवढेच कार्य न करता रावणाच्या सर्व स्थितीचा (शत्रूच्या गुण-अवगुणांचा) अभ्यास तू केलास आणि शेवटी लंका जाळण्याचे महत्कार्य इतक्या शिताफीने करून पुन्हा रामप्रभूंच्या चरणी आलात. यामध्ये तुझी ‘अभ्यासू वृत्ती, धिटाई आणि पूर्ण क्षमतेने कार्य पूर्ण करून संधीचे सोने कसे करायचे ?’ हा आदर्श आम्हाला घालून दिलास. तसे आम्हा सर्व साधकांकडून श्री गुरूंचे मनोगत जाणून त्यांना अपेक्षित अशी परिपूर्ण आणि फलनिष्पत्तीपूर्ण सेवा घडून आम्हाला त्यांचे मन जिंकता येऊ दे.’
२. अनुभूती
मारुतीने ‘स्थुलातून पहावे’, यासाठी प्रार्थना होत असतांना त्याने सूक्ष्मातून पहात असल्याचे सांगणे : अशा प्रकारे प्रार्थना होत असतांना माझे मन मारुतीच्या नेत्रांवर स्थिरावले. ‘त्याचे नेत्र सजीव होऊन त्याच्या पापण्यांची उघडझाप होईल’, असे मला वाटत होते. मी मारुतिरायाला मनातून म्हणाले, ‘तू माझ्याकडे स्थुलातून पहात आहेस’, असे मला अनुभवता येऊ दे.’ तेव्हा मारुतिराया मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘तू अजूनही स्थुलातच अडकली आहेस का ? अगं, मी सूक्ष्मातून तुझ्याकडेच पहात आहे.’ तेव्हा मला त्याची जाणीव होऊन मी त्याची क्षमायाचना केली. मग पुन्हा एकदा त्याला चरणांपासून ते डोक्यापर्यंत न्याहाळतांना मला पुढील ओळी सुचल्या.
गळ्यात शोभती फुलांच्या सुंदर माळा ।
रुद्राक्षातून प्रक्षेपित होती तेजाच्या ज्वाळा ।। १ ।।
मुखकमलावरी दिसे दास्यभाव भोळा ।
ऐसे मनोहर दर्शन देई आम्हा अंजनीपुत्र बाळा ।। २ ।।
– सौ. स्वाती शिंदे, (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |