रामनाथी आश्रमात झालेल्या सेतुरक्षक हनुमानाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. २५.४.२०२१ या दिवशी सेतुरक्षक हनुमानाच्या मूर्तीच्या नेत्रलेखन विधीच्या वेळी आलेल्या अनुभूती

१ अ. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘सेतुरक्षक हनुमानाच्या मूर्तीसाठीचे विधी चालू करण्यापूर्वी त्याच्या शेंदरी रंगाच्या पापण्यांची उघडझाप झाली. यातून ‘हनुमानाची मूर्ती जागृत होत आहे’, असे मला जाणवले.

१ आ. नेत्रलेखन विधीच्या वेळी हनुमानाच्या एका डोळ्यात काळोख आणि दुसर्‍या डोळ्यात प्रकाश दिसणे अन् त्याचे हनुमानाने सूक्ष्मातून सांगितलेले कारण : हनुमानाच्या मूर्तीच्या नेत्रलेखन विधीच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ मध आणि तूप यांच्या मिश्रणात बुडवलेल्या सोन्याच्या तारेने हनुमानाचे नेत्रलेखन करत होत्या. तेव्हा मला त्याच्या एका डोळ्यात गडद काळोख आणि दुसर्‍या डोळ्यात लख्ख प्रकाश दिसला. मी सूक्ष्मातून मारुतिरायाला याचे कारण विचारले. तेव्हा त्याने मला सांगितले, ‘माझे प्रकाशावर अधिपत्य आहे, तसे अंधारावरही आहे. प्रकाश हा सत्त्वगुणाकडे नेणारा आहे, तर अंधार हा तमोगुणाकडे नेणारा असला, तरी त्यावर (वाईट शक्तींवर) माझे नियंत्रण आहे.’

१ इ. हनुमानाच्या मूर्तीच्या डोळ्यांना अंजन लावल्यावर त्याच्या डोळ्यांतील भानु (सूर्य)शक्ती जागृत होऊन ७ रंग दिसणे आणि ‘मूर्ती निर्गुणाकडून सगुणाकडे प्रवास करत आहे’, असे जाणवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी अनामिकेने हनुमानाच्या मूर्तीच्या डोळ्यांना अंजन लावले. तेव्हा त्याच्या डोळ्यांतील भानुशक्ती जागृत झाली आणि मला त्याच्या डोळ्यांत ७ वेगवेगळे रंग दिसले. सूर्याच्या अनेक नावांपैकी एक नाव ‘भानु’, असे आहे. सृष्टीतील हे रंग दिसण्याची प्रक्रिया केवळ सूर्याच्या भानुशक्तीमुळे होते. मारुतीच्या डोळ्यांत भानुशक्ती जागृत झाल्यामुळे मला ७ रंग दिसले. यातून ‘मूर्ती स्थुलाकडे, म्हणजेच निर्गुणाकडून सगुणाकडे प्रवास करत आहे’, असे मला जाणवले.

१ ई. यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मध, तूप आणि साखर यांचे मिश्रण हनुमानाच्या डोळ्यांना लावून पुन्हा अंजन घातले. तेव्हा त्याच्या डोळ्यांतून किरण प्रक्षेपित झाले. या माध्यमातून मूर्ती सगुणात आली.

१ उ. हनुमानाची दृष्टी प्रसन्न आणि वात्सल्यमय दिसणे : मध, तूप आणि साखर यांचे मिश्रण हनुमानाच्या मूर्तीच्या डोळ्यांना लावले जात असतांना हनुमानाची दृष्टी प्रसन्न, सृष्टीकडे कल्याणकारी दृष्टीने पहाणारी अन् वात्सल्यभाव असलेली अशी दिसत होती.

१ ऊ. नेत्रलेखन विधी झाल्यानंतर हनुमानाच्या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये तेजतत्त्व येऊन ती सजीव दिसणे : हनुमानाच्या मूर्तीचे नेत्रलेखन विधी करण्यापूर्वी आणि नेत्रलेखन विधी झाल्यावर छायाचित्र काढले. तेव्हा नेत्रलेखन विधी झाल्यानंतर काढलेल्या छायाचित्रात हनुमानाच्या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये सजीवता येऊन ते जागृत दिसत होते. यातून ‘नेत्रलेखन विधीमुळे हनुमानाच्या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये तेजतत्त्व येऊन मूर्ती सजीव दिसत आहे, तसेच हनुमानाच्या मूर्तीचे डोळे पाणीदार झाले आहेत’, असे मला जाणवले. या सर्व प्रक्रियेमुळे नेत्रलेखन विधीचे, म्हणजे मंत्रांचे सामर्थ्य माझ्या लक्षात आले.

२. तत्त्वहोमाच्या वेळी आलेल्या अनुभूती 

२ अ. ‘यज्ञस्थळी सूक्ष्मातून एक मोठे वानर आले आहे’, असे जाणवणे : २७.४.२०२१ या दिवशी तत्त्वहोम होता. त्या वेळी अंगन्यासाच्या आहुती देत असतांना ‘सूक्ष्मातून एक मोठे वानर यज्ञस्थळी आले आहे’, असे मला जाणवले. तेव्हा ‘मंत्राच्या अनुरूप साक्षात् मारुतीची शक्ती वानराच्या रूपात यज्ञाच्या ठिकाणी आली असून माझ्या उजव्या हाताला सूक्ष्मातून वानराची सावली आली आहे’, असेही मला जाणवले.

२ आ. स्वप्नात सुवर्ण रंगाचा शेषनाग आणि सुवर्ण रंगाचे अनेक छोटे नाग दिसणे अन् ‘हनुमानाने हे सर्व दैवी सुवर्ण रंगाचे नाग आश्रमाच्या रक्षणासाठी निर्माण केले आहेत’, असे जाणवणे : २७.४.२०२१ या दिवशी सेतुरक्षक हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यावर दुपारी मी विश्रांती घेत होते. तेव्हा मला स्वप्नात सुवर्ण रंगाचा शेषनाग आणि सुवर्ण रंगाचे अनेक छोटे नागही दिसले. ‘हनुमानाने हे सर्व दैवी सुवर्ण रंगाचे नाग आश्रमाच्या रक्षणासाठी निर्माण केले आहेत. हनुमान हा रुद्राचा अवतार असल्याने ते सुवर्ण रंगाचे नाग, म्हणजे शंकराचे गण आहेत’, असे मला जाणवले. मला माझ्या डोळ्यांसमोर लख्ख प्रकाश दिसला.

३. हनुमानाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी आलेली अनुभूती

३ अ. पंचमुखी हनुमानाचे दर्शन होणे : साधक पुरोहित मूर्तीची प्रतिष्ठापना करत असतांना ‘हं’ या बीजमंत्राचा नाद सार्‍या ब्रह्मांडात घुमला. तेव्हा मला पंचमुखी मारुतीचे दर्शन झाले. त्याची पाचही मुखे वरच्या दिशेने बघत होती. त्या वेळी ‘हनुमानाच्या मूर्तीमध्ये मारुतीचे तत्त्व अवतरले’, असे मला जाणवले.

४. आरतीच्या वेळी आलेली अनुभूती

सेतुरक्षक हनुमानाची मूर्ती ठेवलेल्या गाभार्‍यात एकही खिडकी नसून आत वारा आला. यातून हनुमान हा वायुपुत्र असल्याने त्याद्वारे त्याने ‘तो मंदिरात आला आहे’, याची अनुभूती दिली. ‘मूर्तीमध्ये जिवंतपणा आल्याचे जाणवून ती मूर्ती, म्हणजे त्याचे रूप आहे’, असे मला जाणवले.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.५.२०२१)      

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक