श्रीरामभक्तीमय झालेल्या हनुमंताप्रमाणे ‘गुरुभक्ती’ आणि ‘गुरुसेवा’ हाच साधकांसाठी ध्यास अन् श्वास बनावा !
हनुमान जयंतीनिमित्त श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा शुभसंदेश !
‘३०.३.२०२३ या दिवशी श्रीरामनवमी झाली. युगानुयुगे ज्याच्या दैवी अवतारत्वाचा ठसा जनमानसात ठसलेला आहे, तो प्रभु श्रीरामचंद्र या घोर कलियुगातही श्रीरामनवमीच्या निमित्ताने अयोध्येचा राजा पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनामनात अंतस्थ विराजमान झाला आहे. आता श्रीरामभक्त महाबली हनुमंताचे अवतरण होईल. ६.४.२०२३ या दिवशी हनुमान जयंती आहे.
ज्याचा ‘रामभक्ती’ हाच मंत्र असून ‘रामसेवा’ हाच ध्यास आहे, तो म्हणजे हनुमंत ! श्रीरामाच्या राज्याभिषेकानंतर त्याच्या श्रीचरणकमलांशी बसून हनुमंताने आपल्या प्राणनाथ प्रभूंना पुढील प्रार्थना आर्ततेने केली.
‘रामकथेचे चिंतन गायन । ते रामाचे अमूर्त दर्शन ।
इच्छामात्रे या दासाते रघुकुलदीप दिसावा ।। एकच वर द्यावा । प्रभो, मज एकच वर द्यावा ।।’
‘श्रीरामाच्या दिव्य अवतारी चरित्राचे पुनःपुन्हा स्मरण करणे, त्यातील श्रीराममय भावार्थाचे चिंतन करणे, रामचरित्राचे गायन करणे, यातूनही श्रीरामाच्या निर्गुण (अमूर्त) रूपाच्या दर्शनाप्रमाणेच आनंद मिळतो. ‘हे प्रभो, या प्रयत्नांद्वारे या दास हनुमंताला ‘जेव्हा जेव्हा इच्छा होईल, तेव्हा रघुकुलदीपक प्रभु श्रीरामांचे दर्शन घडावे’, असा वर द्यावा.’
‘या कलियुगात अवतरलेल्या श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) अवतारत्वाची अनुभूती घेत रहाणे’, हीच ‘गुरुभक्ती’ आहे, तर त्यांच्या अवतारी चरित्राचे कीर्तन करणे, म्हणजेच ‘गुरुसेवा’ आहे. ‘गुरुभक्ती’ आणि ‘गुरुसेवा’ हेच या घोर कलियुगातून तरण्यासाठी आपल्याला भगवंताकडून मिळालेले सर्वाेत्तम वरदान आहे.
साधकांनो, ‘गुरुभक्ती’ आणि ‘गुरुसेवा’ यांद्वारे रामावतारी श्री गुरूंच्या चैतन्यस्वरूपाचे दर्शन घेऊन त्यांचे ते चैतन्य अखंड अनुभवूया !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (५.४.२०२३)