गोवा : १० वी इयत्तेच्या परीक्षेतील कोकणी प्रश्नपत्रिकेमध्ये चूक झाल्याने विद्यार्थी आणि पालकवर्ग गोंधळात !
छपाईच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना एक गुण देणार असल्याचे मंडळाचे स्पष्टीकरण
पणजी, ४ एप्रिल (वार्ता.) – गोवा शालांत मंडळाच्या १० वी इयत्तेच्या परीक्षेतील कोकणी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चूक झाल्याने विद्यार्थी आणि पालकवर्ग दोघांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार मंडळाच्या छाननी (स्क्रूटीनी) समितीने कोकणी प्रश्नपत्रिकेमध्ये छपाईची चूक झाल्याने संबंधित विद्यार्थ्यांना त्याच्या मोबदल्यात १ गुण देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.
#SSC #students in a fix, complain Goa Board bungled up with #Konkani question paper
Read on: https://t.co/xkhmXB21Go#TodayInHerald #Goanews #news #Headlines #SSCExams #children #parents #teachers #schools #mistakes pic.twitter.com/GKN2lyViFC— Herald Goa (@oheraldogoa) April 4, 2023
मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये पुढे म्हणाले,
‘‘आक्षेपानुसार ‘३ ख, अ’ या प्रश्नामध्येच उत्तर असल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी उत्तर लिहिलेल्या विद्यार्थ्यांना त्यानुसार गुण मिळणारच आहेत आणि यामध्ये कोणताही वाद नाही; मात्र अन्य एका प्रश्नामध्ये एका ठिकाणी ‘रिवण’ हा शब्द ‘खीणा’ असा चुकीचा छापला गेला आहे. या चुकीसाठी विद्यार्थ्यांना एक गुण दिला जाणार आहे. प्रत्येक विषयाची परीक्षा झाल्यानंतर त्या त्या दिवशी छाननी समितीची बैठक होत असते. कोकणी विषयाची परीक्षा झाल्यानंतरही समितीची बैठक झाली. यामध्ये मंडळाचा समन्वयक, दोन मुख्य ‘मॉडरेटर’ आणि एक तज्ञ यांचा समावेश होता. या बैठकीत कुणाचेही आक्षेप आलेले असल्यास त्याविषयी चर्चा केली जाते. छाननी समितीच्या बैठकीत छपाईतील चुकीसाठी एक गुण देण्याचा निर्णय झाला आहे.’’ प्रश्नपत्रिकेमधील चुका आणि चुकीच्या पद्धतीने प्रश्न मांडल्याने विद्यार्थ्यांना ५ ते १० गुणांना मुकावे लागणार असल्याची भीती विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.