महाराष्ट्राकडून विर्डी धरणाचे काम बंद
गोवा सरकारने कायम पाळत ठेवण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी
पणजी, ४ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्र सरकारने विर्डी धरणाचे काम बंद केले आहे. सरकारी अधिकारी विर्डी धरणाचे काम चालू असलेल्या ठिकाणी जाऊन आले आहेत आणि तेथे आता काम बंद आहे. महाराष्ट्र सरकारकडे आजच्या घडीला विर्डी धरणाचे काम करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची अनुज्ञप्ती नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.
After Goa protest, Maha halts work on Virdi dam https://t.co/Lj0H90ZjLh
— TOI Goa (@TOIGoaNews) April 4, 2023
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले,
‘‘विर्डी धरणाच्या कामासंदर्भात राज्य सरकारच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे, तसेच गोवा जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी महाराष्ट्र सरकारच्या मुख्य अभियंत्यांना नोटीस बजावली आहे. त्यात त्यांना तात्काळ काम बंद करण्याची सूचना करण्यात आली होती. धरणाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र सरकारकडे कोणतीही अनुज्ञप्ती नाही आणि त्यामुळे हे काम पुढे नेले जाऊ शकत नाही.’’
जलस्रोत खात्याच्या पथकाकडून विर्डी धरण परिसराला भेट
धरणाचे काम थांबवले असल्याची निश्चिती करून घेण्यासाठी जलस्रोत खात्याच्या अधिकार्यांनी खात्याचे संचालक प्रमोद बदामी यांच्यासह ४ एप्रिल या दिवशी विर्डी धरण परिसराला भेट दिली. संचालक प्रमोद बदामी यांनी परिसराची पहाणी केल्यानंतर धरणाचे बांधकाम पूर्णपणे थांबवले असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. तत्पूर्वी ३ एप्रिल या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आदेशानंतर गोवा सरकारने महाराष्ट्र सरकारला काम त्वरित बंद करण्याविषयी नोटीस पाठवली होती. याच दिवशी गोवा जलस्रोत खाते आणि ‘म्हादई सेल’चे कार्यकारी अभियंता लीप नाईक अन् त्यांच्या पथकाने विर्डी परिसराला भेट देऊन त्यासंबंधीचा सविस्तर अहवाल त्वरित शासनाला सुपुर्द केला.
सरकारने कायम पाळत ठेवावी ! – पर्यावरणप्रेमी
गोव्यातील पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी २ एप्रिल या दिवशी विर्डी धरण परिसराला भेट दिल्यानंतर विर्डी धरणाचे काम चालू असल्याचे वृत्त गोवाभर पसरले आणि राज्यभर खळबळ उडाली. (एका पर्यावरणप्रेमीला समजले, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला का समजत नाही, याचा विचार करायला हवा ! – संपादक) यानंतर प्रशासकीय यंत्रणेने तत्परतेने पावले उचलली. कर्नाटकनंतर आता महाराष्ट्रही म्हादईचे पाणी वळवण्याचे काम करत आहे आणि त्याची गोवा शासनाला चाहूलही लागत नाही, याविषयी पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र सरकारने अचानक कुणालाही कल्पना न देता आणि कुणाचीही अनुज्ञप्ती न घेता विर्डी धरणाचे अनधिकृत बांधकाम चालू केले. आता काम बंद असले, तरी ते पुन्हा कधीही चालू होऊ शकते. सरकारने संबंधित ठिकाणी कायम पाळत ठेवली पाहिजे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
दोडामार्ग तालुक्यात ४ धरण प्रकल्प बांधण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव ! – प्रा. राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ
महाराष्ट्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात शिड्याची मळ, धनगरवाडी, मोराची राय आणि आमडगाव (माटणे) या ठिकाणी धरण प्रकल्प बांधण्याचा प्रस्ताव आखला आहे. दोडामार्ग तालुक्यासाठी अधिक पाणी सोडता यावे, यासाठी विर्डी धरण प्रकल्पाजवळील बोगद्याची डागडुजी करण्यात येत आहे, असा दावा गोव्यातील प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी केला आहे.
♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦