व्यक्तीच्या प्रकृतीनुरूप आहारविहार !
मागील लेखामध्ये आपण आपली प्रकृती कशी ओळखायची ? हे वाचले. आजच्या लेखामध्ये आपल्या प्रकृतीनुसार आहारविहार कसा असावा ? हे येथे देत आहोत. ‘कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तीने कसा आहारविहार करायचा, याविषयी सांगताना महर्षि चरक म्हणतात,
‘विपरीतगुणस्तेषां स्वस्थवृत्तेर्विधिर्हित:’
– चरकसंहिता, सत्रस्थान, अध्याय ७, श्लोक ४१
अर्थ : आपली प्रकृती ज्या दोषाची असेल, त्याच्या विरुद्ध गुणांचा आहारविहार केला, तर आपले आरोग्य चांगले राहू शकते.
१. वात प्रकृतीच्या व्यक्तीचे पथ्य, अपथ्य आणि दिनक्रम
१ अ. आहार कसा असावा ?
१. वातप्रकृतीच्या व्यक्तीने त्याच्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचा उपयोग केला पाहिजे, म्हणजे पोळी किंवा भाकरी खातांना त्याला तूप लावून खायला हवी. त्यांनी आमटी किंवा भात यांवरही तूप घेण्यास हरकत नाही. वात प्रकृतीच्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात तेल आणि तूप यांचा वापर थोडा अधिक केला, तरी त्यांना त्याचा फार त्रास होत नाही. उलट त्यांना ते पथ्यकर असते.
२. गोड, आंबट आणि खारट चवीचे पदार्थ आपल्या आहारामध्ये असायला हवे. भाज्या आणि फळे खातांना याचा विचार करणे आवश्यक आहे. मागच्या लेखामध्ये आपण कोणत्या चवीचे पदार्थ कोणते दोष अल्प करतात ? हे वाचले आहे. वात प्रकृतीच्या व्यक्तीने वरील चवीचे पदार्थ त्यांच्या आहारामध्ये घ्यावेत.
१ आ. आहार घेतांना पाळावयाची पथ्ये
१. वात प्रकृतीच्या व्यक्तीने त्याच्या आहारामध्ये चिप्स, पॉपकॉर्न, फरसाण, कुरकुरे असे पदार्थ टाळायला हवेत. बहुतेक दुपारच्या वेळेत भूक लागल्यानंतर असे पदार्थ खाण्याची प्रवृत्ती दिसून येते. असे पदार्थ वात प्रकृतीच्या व्यक्तीने सेवन केल्यास त्यांना अपचन, गॅस होणे, पोट फुगणे असे विविध प्रकारचे त्रास होतांना दिसून येतात.
२. वात प्रकृतीच्या व्यक्तीने कडधान्ये विशेषत: हरभरा आणि वाटाणा खाण्याचे टाळावे. कडधान्य मोड आलेले न खाता ते भिजवून आणि शिजवून मगच खायला हवे. कच्च्या भाज्या सलाद स्वरूपात खाण्यापेक्षा त्या थोड्याशा वाफवून मग खायला हव्यात.
३. कोरडे आणि शिळे अन्न वात प्रकृतीच्या व्यक्तीने कटाक्षाने टाळले पाहिजे. चांगले ताजे अन्न खावे. गरम भोजन ग्रहण करावे. शीतकपाटातील अन्न वारंवार गरम करून जेवणे वात प्रकृतीच्या व्यक्तीसाठी हानिकारक आहे.
४. वात प्रकृतीच्या व्यक्तीसाठी आईस्क्रीम आणि शीतपेये हे पदार्थ हानिकारक आहेत.
१ इ. दिनक्रम कसा असावा ? : वातप्रकृतीची व्यक्ती ही चंचल स्वभावाची असते. त्यामुळे ती कोणतेही एक नियोजन पाळू शकत नाही. थोडी शिस्तबद्धता आणि आरोग्याविषयीची जागरूकता असेल, तर वातप्रकृती असलेली व्यक्तीही दीर्घकाळपर्यंत निरोगी राहू शकते.
१. वात प्रकृतीच्या व्यक्तीने अधिक काळ कधीही उपाशी राहू नये. पुष्कळ वेळ उपाशी राहिल्याने त्यांच्या शरिरात लगेच वात वाढतो.
२. या व्यक्तीने वातानुकूलित यंत्र आणि कूलर यांच्यापासून कटाक्षाने लांब राहिले पाहिजे. ती दीर्घकाळपर्यंत कूलरच्या संपर्कात आल्यास पुढे जाऊन त्यांना सारखे आजार होण्याची शक्यता असते.
३. अंघोळीपूर्वी प्रतिदिन तेलाने मालिश करावी. अंघोळ करतांना कोमट पाण्याचा वापर करावा. कधीही थंड पाण्याने अंघोळ करू नये.
४. बाहेर पडतांना थंड वार्याचा संपर्क टाळण्यासाठी कानाला स्कार्फ बांधला पाहिजे.
५. अशा प्रकृतीच्या व्यक्तीने फार शारीरिक दगदग टाळली पाहिजे. तसेच अतीव्यायाम, पुष्कळ चालणे, पळणे असे व्यायाम प्रकारही टाळायचे आहेत. अशा व्यक्ती योगासनांसारखे स्थिरता देणारे व्यायाम प्रकार करू शकतात.
६. अतीविचार टाळण्यासाठी प्राणायाम शिकून तो नियमितपणे करायला हवा.
२. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचे पथ्य, अपथ्य आणि दिनक्रम
पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला उष्णता आणि भूकही सहन होत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी भूक लागल्यानंतर लगेच जेवायला हवे.
२ अ. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचा आहार
१. आहारामध्ये तुरट, कडू आणि गोड चवीच्या पदार्थांचा समावेश असायला हवा.
२. चटणी खायची असल्यास नारळ, पुदिना आणि कोथिंबीर यांचा वापर करू शकतो.
३. आहारामध्ये तेलाचे प्रमाण बेताचे असले पाहिजे.
४. कडधान्यामध्ये मुगाचा वापर करायला हरकत नाही.
५. आहारामध्ये ताक अंतर्भूत करायला हवे.
६. फळांमध्ये द्राक्ष, मनुका, अंजीर आणि पपई यांचा समावेश करावा.
७. आहारात दूध, तूप आणि लोणी या पदार्थांचा निश्चित समावेश करावा.
२ आ. आहार घेतांना पाळावयाची पथ्ये
१. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने मसाल्याचे पदार्थ कटाक्षाने टाळायला हवेत. खडा मसाला हा पुष्कळ अधिक पित्त वाढवणारा असतो. आठवड्यातून एखाद्या वेळेस याचा वापर करायला हरकत नाही; परंतु खडा मसाल्याची वारंवारता आपल्या आहारात टाळणे आवश्यक आहे.
२. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला आंबवलेले पदार्थ अतिशय हानिकारक आहेत. इडली, डोसा, मेदुवडा, ढोकळा, पाव, खारी, बिस्किटे असे सर्व पदार्थ आंबवलेले असल्याने पित्तकारक आहेत.
३. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने अधिक तेलकट पदार्थ टाळायचे आहेत. वडापाव हे समीकरण अतिशय पित्तकारक आहे; कारण त्यात तेलकट वडा आणि आंबवलेले पाव हे दोन्ही आहेत.
४. आहारात आले आणि लसूण यांचा वापर अल्प असावा.
२ इ. दिनक्रम कसा असावा ?
१. पित्त प्रकृतीची व्यक्ती ही शिस्तबद्ध, म्हणजे परिपूर्णतावादी (परफेक्शननिस्ट) म्हणून ओळखली जाते. परिपूर्णतेच्या नादात या व्यक्तीला मानसिक ताणाचा सामना करावा लागतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती रागीटही असू शकतात. तेव्हा मानसिक ताण आणि क्रोध हे त्याचे पित्त वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात.
२. या व्यक्तीने फार वेळ उन्हाच्या संपर्कात राहू नये. बाहेर पडतांना ‘सन गॉगल’ चा वापर करावा. उन्हामध्ये अधिक काळ श्रम करणे पित्त प्रकृतीसाठी हानीकारक आहे.
३. पोहण्यासारखे व्यायाम पित्त प्रकृतीच्या व्यक्तीसाठी अगदी उत्तम आहेत. मानसिक ताण आणि क्रोध अल्प करण्यासाठी ध्यानधारणा अन् प्राणायाम यांचा अवलंब करावा.
४. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने रात्रीचे जागरण टाळावे. योग्य वेळी आहार आणि योग्य वेळी झोप घेणे या व्यक्तींसाठी लाभदायी आहे.
५. अंघोळ करतांना चंदन, वाळा आणि नागरमुथा यांचे उटणे लावून स्नान करावे, तसेच सुती कपड्यांचा वापर करावा.
६. या प्रकृतीच्या व्यक्तीने एखादा छंद जोपासावा. त्यामुळे त्यांचा मानसिक ताण अल्प होण्यास साहाय्य होते.
७. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला उष्णतेचे त्रास वारंवार होत असतील, तर त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा धने-जिरे भिजवून सकाळी ते पाणी प्यावे. त्यामुळे उष्णतेचा त्रास होणार नाही.
३. कफ प्रकृतीच्या व्यक्तीचे पथ्य, अपथ्य आणि दिनक्रम
३ अ. कफ प्रकृतीच्या व्यक्तीचा आहार
१. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने कडू, तिखट आणि तुरट चवीचे पदार्थ सेवन करावे.
२. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने मसाल्याचे पदार्थ सेवन केल्यास त्याचा त्यांना त्रास होत नाही. ते त्यांच्या आहारात खडा मसाल्याचा निश्चितच समावेश करू शकतात.
३. या व्यक्तींना उडीद सोडून इतर सर्व कडधान्य चालू शकतात.
४. चुरमुरे आणि फरसाण थोड्या प्रमाणात खायला हरकत नाही.
५. ताक प्यायचे असल्यास लोणी काढलेले ताक प्यावे.
६. फळांमध्ये डाळिंब, सफरचंद, पपई अशी फळ स्वास्थ्यकारक आहेत.
७. भाज्या करतांना तेल-तुपाचा वापर अल्प करावा.
३ आ. आहार घेतांना पाळावयाची पथ्ये
१. कफ प्रकृतीच्या व्यक्तीसाठी गोड पदार्थ अयोग्य आहेत. त्यामुळे त्यांनी श्रीखंड, बासुंदी किंवा मिठाई टाळायला हवी.
२. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने तेलकट किंवा तळलेले पदार्थ, म्हणजे भजी, बटाटे वडे, पुर्या असे पचायला जड असणारे पदार्थ खाणे टाळावे.
३. चीजचा मुबलक वापर असलेले पदार्थ, तसेच ‘पिझ्झा बर्गर’ यांना कटाक्षाने टाळावे.
४. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने दही, दूध आणि पनीर इत्यादी दुग्धजन्य पदार्थ जपून खावे.
३ इ. दिनक्रम कसा असावा ?
१. कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी पोट फुगेपर्यंत भोजन करू नये. आठवड्यातून एकदा अवश्य उपवास करावा.
२. तहान लागल्यावरच आणि तेही थोडे थोडे पाणी प्यावे. अधिक प्रमाणात पाणी पिऊ नये.
३. दिवसा झोप घेणे टाळावे.
४. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने भरपूर व्यायाम करावा. धावणे, पळणे, सायकल चालवणे यांसारखे व्यायाम कफ प्रकृतीच्या व्यक्तीने करावेत.
५. अंघोळीपूर्वी त्वचेवर वेखंड चूर्ण चोळावे. जेणेकरून त्वचेखाली साठणारा मेद विरघळतो.
४. प्रकृतीनुसार काय खावे ?
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे.(साभार : ‘पंचम वेद-आयुर्वेद’, यू ट्यूब वाहिनी)