भौतिकवादाच्या प्रभावाखाली असलेल्या जगताला अध्यात्माचा मार्ग दाखवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे दावोस, स्वित्झर्लंड येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. हान्स मार्टिन हेर्लिंग !

‘श्री. हान्स मार्टिन हेर्लिंग हे ‘स्की बूट’ (बर्फावरील खेळ खेळण्यासाठी बनवण्यात आलेले विशेष पद्धतीचे बूट) बनवणार्‍या जगविख्यात आस्थापनाचे मालक आहेत. ते अनेक आस्थापनांचे ‘बोर्ड’ सदस्यही आहेत. या ‘बोर्ड’मध्ये दीर्घकाळ चालू रहाणार्‍या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कार्य करणार्‍या ७० ‘पॅनेल’चा समावेश आहे. सामाजिक दायित्व आणि शाश्वततेकडे वाटचाल हे उद्देश साध्य करण्यासाठी ते विविध विद्यापिठे अन् आस्थापने यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी स्वतः अनेक आस्थापने चालू केली आहेत. त्यांची व्यावसायिक कारकीर्द उत्तम असल्याने त्यांच्याकडे सर्व भौतिक सुखसोयी आहेत; मात्र असे असूनही ‘आयुष्यात काहीतरी न्यून आहे’, असे त्यांना जाणवत होते.

वर्ष २०१८ मध्ये ‘भौतिकशास्त्र आणि अध्यात्म (क्वांटम फिजिक्स अँड स्पिरिच्युॲलिटी)’ याविषयी माहिती शोधतांना त्यांना एका संकेतस्थळाविषयी माहिती मिळाली. ते इतकी वर्षे ज्याच्या शोधात होते, ते त्यांना या संकेतस्थळावर मिळाले. त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. अधिकाधिक लोकांपर्यंत अध्यात्म पोचावे, याची तळमळ असलेले श्री. हान्स मार्टिन !

श्री. हान्स मार्टिन हेर्लिंग

१ अ. नम्र स्वभाव : श्री. हान्स मार्टिन पुष्कळ सधन असूनही त्यांचा स्वभाव अतिशय विनम्र आहे.

१ आ. अध्यात्माचे ज्ञान समाजापर्यंत पोचून भौतिकवादाचा प्रभाव नष्ट होण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे : श्री. हान्स मार्टिन यांच्यात जिज्ञासा आणि शिकण्याची पुष्कळ वृत्ती असून अध्यात्मात प्रगती करण्याची तीव्र तळमळ आहे. त्यांनी अध्यात्मातील अनेक तत्त्वे आत्मसात केली आहेत. सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांविषयी माहिती मिळाल्यावर ते पुष्कळ प्रभावित झाले. ‘समाजातील नकारात्मकता न्यून करून सकारात्मकता कशी वाढवता येईल ?’, या दृष्टीने त्यांना सत्त्व, रज आणि तम हे अध्यात्मातील तत्त्व जगासमोर मांडायचे आहे. ते रहात असलेल्या दावोस (स्वित्झर्लंड) येथे वाढलेला भौतिकवादाचा प्रभाव नष्ट व्हावा, यासाठी अध्यात्माचे ज्ञान तेथील समाजापर्यंत पोचवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.

श्री. शॉन क्लार्क

१ इ. आध्यात्मिक संशोधनावर आधारित लेख स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्धीस देऊन जिज्ञासूंमध्ये अध्यात्माविषयी रुची निर्माण करणे : गोव्यातील ५ दिवसांच्या कार्यशाळेनंतर मायदेशी परतल्यावर श्री. हान्स मार्टिन यांनी आध्यात्मिक संशोधनावर आधारित लेख तेथील ‘जिपफल झायटिग (Gipfel Zytig)’ या स्थानिक वृत्तप्रत्रात प्रसिद्धीसाठी दिले. आतापर्यंत या वृत्तपत्रातून असे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे दावोस येथील अनेक जिज्ञासू लोकांमध्ये अध्यात्माविषयी रुची निर्माण झाली आहे.

१ ई. ‘पीस ऑन स्नो’ या उपक्रमाच्या माध्यमातून जिज्ञासूंना आध्यात्मिक संकल्पनांची ओळख करून देणे : श्री. हान्स मार्टिन यांनी जानेवारी २०२० मध्ये ‘पीस ऑन स्नो’ या नावाने ओळखला जाणारा उपक्रम चालू केला. दावोस येथे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बरोबरीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये उपस्थित असलेल्या लोकांपैकी ६० जण या उपक्रमाला उपस्थित होते. यामध्ये ‘फॉर्च्युन ५००’ सूचीतील (टीप) एका आस्थापनाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.), ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे आयोजक आणि वित्त (आर्थिक) उद्योगातील उच्च व्यवस्थापन पदावर असलेले अन्य लोक यांचा समावेश होता. श्री. हान्स यांनी सत्त्व, रज आणि तम या आध्यात्मिक संकल्पना, तसेच अध्यात्मातील अन्य परिमाणे यांविषयी सांगितलेली माहिती उपस्थित जिज्ञासूंनी लक्षपूर्वक ऐकली.

टीप : ‘फॉर्च्युन ५००’ ही ‘फॉर्च्युन’ नियतकालिकाने बनवलेली आणि प्रकाशित केलेली वार्षिक सूची असून ती अमेरिकेतील सर्वाधिक वार्षिक आर्थिक महसूल असलेल्या पहिल्या मोठ्या ५०० आस्थापनांची सूची आहे.

१ उ. आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला जागतिक स्तरावर नेण्याचे उच्च ध्येय ठेवणारे श्री. हान्स ! : आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्याचा त्यांचा उत्साह, सकारात्मक वृत्ती आणि तळमळ वाखाणण्याजोगी आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे श्री. हान्स यांनी छोटी छोटी ध्येये न घेता ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला जागतिक स्तरावर कसे नेता येईल’, याचे उच्च ध्येय ठेवले आहे. काही मास त्यांनी त्या दृष्टीने प्रायोगिक स्तरावर प्रयत्नही केले आहेत.

१ ऊ. स्नेही आणि परिचित उद्योजक यांच्यासाठी नियमित सत्संग चालू करणे : श्री. हान्स यांनी त्यांचे स्नेही, तसेच परिचित उद्योजक यांच्यासाठी नियमित सत्संग चालू केला आहे. अध्यात्मातील मूलभूत तत्त्वे, उदा. नामजप करणे, तसेच स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया यांविषयी या सत्संगात उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन केले जाते. या सत्संगात सहभागी होणार्‍या जिज्ञासूंच्या गटाला ‘आध्यात्मिक नेतृत्व गट’ असे नाव देण्यात आले आहे. या गटातील एक साधक मरियम म्हणाले, ‘‘श्री. हान्स हे सत्संगातील लोकांना नवीन (आध्यात्मिक) उंचीवर नेणार्‍या एखाद्या अंतराळ विराप्रमाणेच आहेत.’’

१ ए. उद्योजकांनी त्यांची व्यवसायपद्धत पालटून ती निसर्गाला अनुकूल करावी, यासाठी ‘हाऊस ऑफ बॅलन्स’ची निर्मिती करणे : वर्ष २०२२ मध्ये हान्स यांनी लोकांनी एकत्र येऊन रहावे, यासाठी ‘हाऊस ऑफ बॅलन्स’ला स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध करून दिली. यामागे समविचारी लोक एकत्र यावेत आणि उद्योग जगतातील प्रमुखांना त्यांची वृत्ती पालटण्यात, म्हणजे लोभ आणि स्वार्थ यांच्यावर आधारित असलेली त्यांची व्यवसायपद्धत पालटण्यास साहाय्य व्हावे, जेणेकरून ते समाज, वातावरण अन् मातृभूमी यांची काळजी घेतील !’ त्यांच्या या उपक्रमाकडे जगभरातील अनेक प्रमुख उद्योजक आकर्षित झाले. यातूनच श्री. हान्स यांनी ‘हाऊस ऑफ बॅलन्स’ची निर्मिती केली. त्यांच्या या उपक्रमात दावोसचे महापौर, जे श्री. हान्स यांचे मित्र आहेत, तेही सहभागी आहेत. येथे होणार्‍या उपक्रमांना अनेक जण उपस्थित असतात. नंतर शासनाने श्री. हान्स यांना ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’साठी आमंत्रित केले.

२. अध्यात्माचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत होण्यासाठी सतत चिंतन करणारे श्री. हान्स !

२ अ. समाजापर्यंत अध्यात्म पोचवण्याचा ध्यास लागणे : श्री. हान्स एखाद्या बालकाप्रमाणे निरागस आणि निर्मळ आहेत. ते मनमोकळेपणाने बोलतात. त्यांचे बोलणे ऐकतांना मला जाणवले की, ‘अधिकाधिक लोकांपर्यंत अध्यात्म पोचवून ‘लोकांना कसे साहाय्य करता येईल ?’, याविषयी त्यांचे सतत चिंतन चालू असते.’ त्यांचा स्वभाव लहान बालकाप्रमाणे असला, तरी ‘अध्यात्माचा विषय उत्तम पद्धतीने कसा मांडायचा, जेणेकरून लोकांना तो सहज आकलन होऊन स्वीकारता येईल’, याची परिपक्वताही त्यांच्यात आहे.

२ आ. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या विषयांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणे : ‘केवळ भौतिकदृष्ट्या नेतृत्व न करता, आध्यात्मिक नेतृत्वाचा विकास कसा करायचा ? हे नेतृत्व करणार्‍यांना कळावे’, यासाठी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या विषयांचा समावेश करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.

२ इ. आपत्काळात साहाय्यभूत उपाययोजना करणे : येणारा आपत्काळ लक्षात घेऊन त्यांनी घराच्या परिसरात भाज्यांची लागवड केली आहे, तसेच सौरऊर्जेची निर्मिती करणारी यंत्रणाही बसवली आहे.

२ ई. ‘स्की बुटां’ची निर्मिती सात्त्विक प्रकारे करण्याचा प्रयत्न करणे : ‘स्की बुटां’ची (बर्फावरील खेळ खेळण्यासाठी बनवण्यात आलेले विशेष पद्धतीचे बूट बनवण्याची) निर्मिती अधिकाधिक सात्त्विक प्रकारे करण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत.

२ उ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्यशाळेला उपस्थित रहाण्यासाठी श्री. हान्स यांनी त्यांच्या अनेक मित्रांना उद्युक्त केले आहे.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव असणे

श्री. हान्स यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती (परात्पर गुरु डॉक्टरांप्रती) पुष्कळ भाव आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी तुमची विचारपूस केली आहे’, असे आम्ही श्री. हान्स यांना सांगितल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर पुष्कळ आनंद आणि भाव जाणवतो. परात्पर गुरु डॉक्टरांची काही मार्गदर्शनपर सूत्रे समजली की, त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते.’

– श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१.४.२०२३)

सतत आनंदी आणि उत्साही असलेले अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले दावोस, स्वित्झर्लंड येथील श्री. हान्स मार्टिन हेर्लिंग !

१. ‘जगभर अध्यात्मप्रसार व्हावा’, अशी तळमळ असणे

सौ. श्‍वेता क्‍लार्क

‘श्री. हान्स मार्टिन हेर्लिंग यांच्यात पुष्कळ तळमळ आहे. त्यामुळे साधनेला आरंभ केल्यावर अल्पावधीतच ते पुष्कळ सत्सेवा करू लागले. त्यांच्यात तीव्र समष्टी तळमळ असल्यामुळे त्यांना ‘जगभर अध्यात्मप्रसार व्हावा’, असे वाटते.

२. सतत आनंदी आणि उत्साही असणे

श्री. हान्स नेहमी आनंदी असतात आणि कोणतीही सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्या उत्साही आणि आनंदी वृत्तीमुळे त्यांच्या सहवासात आलेल्या साधकांना प्रसन्न वाटते.

३. आध्यात्मिक संशोधनावरील लेख स्वतःच्या ‘जर्नल्स’मधून प्रसिद्ध करणे

श्री. हान्स यांना आध्यात्मिक संशोधनाविषयी पुष्कळ जिज्ञासा असल्यामुळे ते महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य वैज्ञानिकांच्या समुदायांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आध्यात्मिक संशोधनावर आधारित लेख स्वतःच्या ‘जर्नल्स’मधून प्रसिद्ध करतात.

४. श्री. हान्स यांचा भाव

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट दिल्यावर श्री. हान्स म्हणाले, ‘‘मी येथे चैतन्य ग्रहण करायला आलो असून मला आध्यात्मिक इंटरनेटशी (माहितीजालाशी) जोडून रहायचे आहे.’’

५. प्रेमभाव

हान्स यांना साधकांविषयी पुष्कळ जवळीक आणि प्रेम वाटते. आम्हालाही ‘ते कुटुंबातील एक सदस्य असून आमची त्यांच्याशी पुष्कळ जुनी ओळख आहे’, असे वाटते.

६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

श्री. हान्स यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. त्यांचे हस्ताक्षर असलेला कागद ते नेहमी स्वतःजवळ ठेवतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करूनच ते प्रत्येक कृती करतात.

श्री. हान्स मार्टिन यांच्यासारखे गुणसंपन्न साधक दिल्याबद्दल आम्ही सर्व साधक ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– सौ. श्वेता क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१.४.२०२३)