कासारवाडी, माजगाव येथे ‘शंभुराजे’ नाटकातून धर्मवीर संभाजी महाराजांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न !
पोलिसांत तक्रार केल्यानंतर आयोजकांनी पोलिसांसमक्ष क्षमा मागितली !
सावंतवाडी – शहराजवळच्या कासारवाडी, माजगाव येथे झालेल्या ‘शंभुराजे’ या नाटकातील काही प्रसंगांत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मद्यपी दाखवून त्यांची चुकीची प्रतिमा सादर करण्याचा प्रयत्न झाला. नाटक संपल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या शिवप्रेमींनी ही चूक आयोजकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित असलेल्या काहींनी त्यांना धक्काबुक्की केली. अंततः हे प्रकरण पोलीस ठाण्यात जाताच ‘चूक अनावधानाने झाली. अशी चूक पुन्हा होणार नाही’, असे सांगून नाटकाच्या आयोजकांनी क्षमा मागितली.
कासारवाडा येथील चव्हाटा मंदिर येथे नाट्यप्रयोग सादर करण्याची गेल्या काही वर्षांची परंपरा आहे. त्यानुसार २२ मार्च २०२३ या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने ऐतिहासिक नाटक ‘शंभुराजे’ (लेखक ना.ध. कोचरेकर, दिग्दर्शक अतुल कारेकर, निरंजन सावंत) हे सादर करण्यात आले. या नाटकातील काही प्रसंगात छत्रपती संभाजी महाराजांना मद्यपी दाखवून त्यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करत काही शिवप्रेमींनी याला आक्षेप घेतला होता. (या नाटकाच्या संहितेवरच बंदी घालण्याची शिवप्रेमींनी मागणी करावी. यामुळे हे नाटक कुठेच सादर केले जाणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी ते बंद पाडण्याचीही आवश्यकता रहाणार नाही ! – संपादक)
याविषयी समजल्यानंतर आयोजक आणि नाटकातील आक्षेपार्ह प्रसंगांविषयी आक्षेप घेणारे यांना संपर्क करून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही बाजूंची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजी महाराजांना चुकीच्या पद्धतीने सादर करण्यास आक्षेप घेतलेले अभिषेक रेगे यांनी सांगितले की, याविषयी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. तेव्हा पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांनी विषय समजून घेतला. त्यानंतर दोन्ही गटांना बोलावून घेऊन चर्चा का केली ? आणि आयोजकांना छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका चुकीच्या पद्धतीने मांडल्याचे लक्षात आणून दिले. त्यानंतर आयोजकांनी क्षमा मागितली. समस्त कासारवाडा ग्रामस्थांच्या वतीने अतुल कारेकर यांनी ‘आमच्या समाजमंडळाकडून नाटकातून कुणाच्याही भावना दुखावतील, असा प्रयोग सादर केला जाणार नाही, याची खात्री देतो’, असे पोलिसांना सविस्तर लेखी लिहून दिले आहे.