सोलापूर शहरातील पाणीपुरवठा किमान ३ दिवसाआड करण्याचा प्रयत्न ! – संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त
सोलापूर, ४ एप्रिल (वार्ता.) – सध्या शहरात ४ ते ५ दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील काही मासांमध्ये शहरात किमान ३ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न असेल. शहराची लोकसंख्या वाढली असल्याने २६ नवीन पाण्याच्या टाक्या बसवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शहरात टप्प्याटप्प्याऐवजी एकाच वेळी सर्वत्र पाणीपुरवठा केला जाईल. पालिका अतिरिक्त आयुक्त या पदावर असेपर्यंत हे काम मार्गी लागावे, असा संकल्प असेल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे म्हणाले. श्रमिक पत्रकार संघातील कार्यक्रमात ते बोलत होते. संदीप कारंजे पुढे म्हणाले की…
१. पुढील काही दिवसांमध्ये शहरातील बोगस नळांचा शोध घेणारी मोहीम हाती घेतली जाणार आहे. बोगस नळधारकांना पैसे भरून अधिकृत जोडणी करून घेण्याची विनंती केली आहे. तरीही शहरात बोगस नळजोडणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास प्रारंभ करणार आहोत.
२. शहरातील सध्याच्या १७ बसगाड्यांत १३ बसगाड्या वाढवण्यात येणार असल्याने पुढील काही दिवसांमध्ये शहरात ३० बसगाड्या धावतील.
१० वर्षे जनतेच्या आरोग्याशी खेळणारे सोलापूर महापालिका प्रशासन !
‘१० वर्षांपूर्वी शहरात गढूळ पाण्याच्या पुरवठ्यामुळे कॉलरा होऊन २१ जणांचा मृत्यू झाला होता. तरीही अद्याप मलनिःसारण वाहिन्यांमध्ये सुधारणा का झाली नाही ?’ असे विचारले असता कारंजे यांनी सांगितले की, काही ठिकाणी मलनिःसारण वाहिनी आणि त्याखाली जलवाहिनी आहे. मलनिःसारण वाहिनी गळत असल्यास ते पाणी पाण्याच्या वाहिनीमध्ये मिसळून गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. (हे पाणी केवळ गढूळ नव्हे, तर अशुद्ध असल्याने आरोग्यास घातक आहे. १० वर्षे एवढ्या गंभीर समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारे महापालिका प्रशासन आणि ‘अशुद्ध’ पाण्याला ‘गढूळ’ म्हणून समस्येची तीव्रता न्यून करणारे प्रशासकीय अधिकारी ! – संपादक) मलनिःसारण वाहिन्या जुन्या झालेल्या आहेत. खरेतर त्या पालटणे आवश्यक आहे; मात्र निधीअभावी सध्या ते शक्य नाही. गावठाण येथील वाहिन्या पालटल्याने तेथील गढूळ पाण्याची समस्या दूर झाली.
संपादकीय भूमिका१० वर्षे अशुद्ध पाणीपुरवठा करणार्या सोलापूर महापालिका प्रशासनाला नागरिकांनी जाब विचारावा ! |