परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अभ्यासवर्गात साधना दशापराधविरहित आणि धर्माचरण करण्यास शिकवत साधकांना घडवणे
‘वर्ष १९९० पासून परात्पर गुरु डॉ. आठवले गोव्यात प्रतिमास दिवसभराचे अभ्यासवर्ग घेण्यासाठी येत होते. अभ्यासवर्गात त्यांनी आम्हाला ‘साधना म्हणजे काय ? ती कशी करायची ?’ इत्यादी शिकवले. त्याच समवेत ‘साधना दशापराधविरहित असावी’, हेही त्यांनी आम्हाला शिकवले.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीमुळे समाजात साधकांविषयी जनमत चांगले होणे
प्रारंभी काही साधक त्यांच्या कार्यालयातून पेन (लेखणी), पेन्सिल, खोडरबर, कोरे कागद इत्यादी साहित्य आणायचे आणि त्यांचा उपयोग अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी करायचे. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी अभ्यासवर्गात सांगितले, ‘‘कार्यालयीन साहित्याचा उपयोग चांगल्या कारणासाठी करत असलात, म्हणजे त्याचा उद्देश जरी चांगला असला, तरी कुणालाही न विचारता साहित्य घेऊन येणे, हे एक प्रकारे चोरी केल्यासारखे आहे. असे केल्याने आपली साधना खर्च होते. आपली साधना दशपराधविरहित असावी.’’ त्यानंतर एकाही साधकाने तसे केले नाही. त्यामुळे ‘सनातनचे साधक पुष्कळ प्रामाणिक असतात’, हे जनमत सिद्ध होऊ शकले.
२. साधकांना वाहतुकीचे नियम पाळण्यास सांगून त्यांना धर्माचरणाची सवय लावणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गानंतर गोव्यात ठिकठिकाणी साप्ताहिक सत्संग घेण्यात येत होते. या सत्संगांना स्थानिक साधक एकत्र यायचे. अधूनमधून सत्संगसोहळा आयोजित करण्यात येत होता. या सत्संगसोहळ्याला गोव्यातील सर्व साधक एकत्र येत होते. साप्ताहिक सत्संग किंवा सत्संगसोहळा यांसाठी जातांना साधक आपापल्या दुचाकीवरून जात होते; मात्र दुचाकीवर केवळ २ साधक न बसता ३ – ३ साधक बसून जात होते. हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना समजल्यावर सर्वांना कळावे; म्हणून नंतरच्या अभ्यासवर्गात त्यांनी सांगितले, ‘‘सत्संगाला अधिकाधिक साधक जाणे हे जरी योग्य असले, तरी आपण सामाजिक नियम पाळायलाच हवे. दुचाकी किंवा चारचाकी असो, तिच्या क्षमतेपेक्षा अधिक जणांनी प्रवास करणे अयोग्य आहे.’’ त्यांनी गाडीचा वेगही किती असावा, हेही साधकांना सांगितले होते.’ (पुढे साधक त्याप्रमाणे वागू लागले.)
– सौ. विजयलक्ष्मी आमाती, फोंडा, गोवा. (२३.९.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |