हनुमंता, तूच आहेस माझे सर्वकाही ।
डिसेंबर २०२१ मध्ये मी ध्यानमंदिरात वायुदेवाचा नामजप करत होतो आणि भ्रमणभाषवर हनुमान चालिसा ऐकत होतो. त्या वेळी मला अचानक पुष्कळ शांत वाटले आणि माझे मन निर्विचार अन् स्थिर झाल्याचे जाणवले. तेव्हा माझ्या चेहर्यावर वार्याची झुळूक आली. त्यानंतर मला साक्षात् भगवान हनुमान दिसले. तेव्हा ‘ते कुठल्यातरी गुहेत आहेत’, असे वाटले. मी डोळे उघडले. तेव्हा मला भगवान हनुमान आणि परात्पर गुरुदेव यांच्याबद्दल अपार कृतज्ञता वाटली. ध्यानमंदिरात असलेल्या हनुमंताच्या चित्राकडे पाहिल्यावर ‘तो स्मितहास्य करत आहे’, असे मला वाटले. त्या प्रसंगानंतर देवाने मला पुढील कविता सुचवली.
युगानु्युगे इथे आहेस भगवंता ।
पिढ्यान्पिढ्या आम्हावर आहे तुझी कृपा ।। १ ।।
गुहेत बसून रामाचे ध्यान करता ।
केवढी ती तुझी भक्ती हनुमंता ।। २ ।।
दक्षिणेची लंका जाळता शेपटीने ।
उत्तरेची संजीवनी नेता गुरूंकडे ।। ३ ।।
भक्ती करतोस श्रीरामाची ।
न पहाता इकडे तिकडे ।। ४ ।।
हनुमंता, तूच आहेस माझे सर्वकाही ।
बोलायला गेलो, तर माझ्याजवळ शब्द नाही ।। ५ ।।
हातात गदा अन् मनात राम ।
गळ्यात भक्तीच्या माळा, असा असे चैतन्यदायी हनुमान ।। ६ ।।
राम नाम, राम नाम ।
हेच तुझे प्राण आणि काम ।। ७ ।।
शेंदूराने अंग लेपून ।
रुद्राक्षांची माळ घालून ।। ८ ।।
मोह माया बाजूला टाकून ।
स्मरण करतोस सर्व सोडून ।। ९ ।।
कशी करता एवढी भक्ती ।
शिकव मलासुद्धा देवा मारुति ।। १० ।।
– श्री. साहस शिरोडकर (वय १८ वर्षे), फोंडा, गोवा.(५.२.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |