दास्यभावातून मारुतिरायाच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणारे प.पू. दास महाराज !
चैत्र पौर्णिमेला (६ एप्रिल या दिवशी) हनुमान जयंती आहे. त्या निमित्ताने…..
१. प.पू. दास महाराज मारुतीच्या दर्शनासाठी जाण्यास निघणे, त्याच वेळी अकस्मात् जोरात पाऊस आणि वारा येणे.
‘२५.६.२०२२ या दिवशी प.पू. दास महाराज नेहमीप्रमाणे मारुतीच्या दर्शनासाठी जायला निघाले आणि त्याच वेळी अकस्मात् जोराचा पाऊस अन् वारा येत होता. त्या वेळी त्यांच्या सेवेत असणार्या साधकांनी त्यांना विचारले, ‘‘जोरात पाऊस पडत आहे, तर दर्शनाला जायचे कसे करूया ?’’ त्यावर प.पू. दास महाराज म्हणाले, ‘‘पावसाचे काही नाही. आपण दर्शनाला जाऊया.’’
२. प.पू. दास महाराज यांनी मारुतिरायाला प्रार्थना करून वरुणदेवतेला थांबण्यास सांगणे, ‘वरुण देवता न थांबल्यास भिजतही दर्शनाला येऊ शकतो’, असे सांगणे आणि पाऊस चालू असतांना मारुतीच्या दर्शनासाठी जाणे.
त्यानंतर प.पू. दास महाराज यांनी सहज प्रार्थना केली, ‘हे मारुतिराया, ‘मला दर्शनाला यायचे आहे. वरुणदेवतेला जरा थांबायला सांगाल का ? वरुणदेवता थांबली नाही, तरी चालेल. मला काही मोठी अडचण नाही. मी असाच पावसात भिजतही दर्शनाला येऊ शकतो !’, असे म्हणून ते पावसात चारचाकी वाहनात बसले आणि मारुतीच्या दर्शनाला निघाले.
३. वाहनातून उतरताच पाऊस पूर्णपणे थांबणे, दर्शन घेतल्यानंतर प.पू. दास महाराज यांनी मारुतिरायाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे अन् गाडीत बसल्यावर पुन्हा जोरात पाऊस चालू होणे
प.पू. दास महाराज वाहनातून उतरत असतांना पाऊस पूर्णपणे थांबला आणि ते मारुतिरायांच्या दर्शनाला गेले. त्यानंतर त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली, ‘मारुतिराया, तुझ्यामुळे पाऊस आणि वारा थांबला अन् तूच तुझे दर्शन घडवलेस. सर्व पंचमहाभूते तुझ्याच हातात आहेत. तुझ्यामुळेच मी वायुनंदन आणि पवनसुत यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. कृतज्ञता व्यक्त करून आम्ही गाडीत येऊन बसल्यावर दोन मिनिटांनी पुन्हा जोरात वारा आणि पाऊस चालू झाला.
४. प.पू. दास महाराज यांनी दास्यभावातून सहज केलेली प्रार्थना मारुतिरायांपर्यंत पोचून त्यानुसार वातावरणात लगेच पालट होणे
वरील प्रत्यक्ष अनुभूती साक्षात् मारुतिरायांनी प.पू. दास महाराज यांच्या माध्यमातून आम्हाला दिली. प.पू. दास महाराज यांनी दास्यभावातून सहज केलेली प्रार्थना मारुतिरायांपर्यंत पोचून त्यानुसार वातावरणात लगेच पालट झाला. आम्हालासुद्धा प.पू. दास महाराज यांच्यासह मारुतिरायाचे दर्शन घेता आले. आम्हा सर्वांना ‘मारुतिराया प.पू. दास महाराज यांच्या माध्यमातून आमच्या समवतेच आहेत’, असे जाणवत होते.
मारुतिराया आणि प.पू. दास महाराज यांनी स्थुलातून आम्हाला ही अनुभूती दिली. त्याबद्दल आम्ही सर्व त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– सर्वश्री आशुतोष गायकवाड, घनश्याम गावडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि कु. माधवी पोतदार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा; श्री. अमित डगवार, फोंडा, गोवा; श्री. आकाश जगताप, श्री. रोहित कोन्ड्रालू, पुणे. (२५.६.२०२२)
प.पू. दास महाराज यांच्या सेवेत असतांना ‘भगवंतच भक्ताचे नियोजन कसे करतो !’ याची साधिकेला आलेली प्रचीती !
‘प.पू. दास महाराज यांच्यासह सेवेनिमित्त बाहेर गावी जायचे असेल, तेव्हाही अनेकदा अशी अनुभूती येते. तेव्हा पाऊस आणि वारा यांचा त्रास होत नाही. प.पू. दास महाराज गोकर्ण, मुरडेश्वर यांसारख्या कोणत्याही मंदिरात दर्शनासाठी गेले आणि तेथे गर्दी असेल, तर ती गर्दी आपोआप न्यून होते. प.पू. दास महाराज यांना मंदिराच्या गर्भगृहात जाण्यासाठी मार्ग मोकळा होऊन त्यांना सहज देवाचे दर्शन घडते. या अनुभूतीवरून प.पू. दास महाराज यांच्यातील दास्यभावामुळे ‘देवताच त्यांना प्रत्येक क्षणी साहाय्य करण्यासाठी येतात’, असे मला वाटते.
‘भक्ताला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये; म्हणून भगवंतच भक्ताचे (प.पू. दास महाराज यांचे) नियोजन कसे करतो !’, याची प्रचीती भगवंताने दिली. या अनुभूतीबद्दल मी प.पू. दास महाराज यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. माधवी पोतदार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.६.२०२२)