१५ एप्रिलला रत्नागिरीत ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘हिंदू गर्जना मोर्चा’

रत्नागिरी, ४ एप्रिल (वार्ता.) – येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने १५ एप्रिल या दिवशी हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्याच्या नियोजनाची बैठक शहरातील मारुति मंदिर येथील हॉटेल ‘विवा एक्झिक्युटिव्ह’च्या सभागृहात पार पडली.

या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. चंद्रकांत राऊळ म्हणाले की, हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, देवतांचे विडंबन आदी आघात सातत्याने होत आहेत. यांविषयी हिंदूंमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि हिंदूंचे संघटन व्हावे, या उद्देशाने १५ एप्रिल दिवशी दुपारी ४ वाजता हिंदू गर्जना मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याचा प्रारंभ शिवतीर्थ, मारुति मंदिर येथे होऊन सांगता स्वातंत्र्यलक्ष्मी चौक येथे होणार आहे. या मोर्च्याला हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री. धनंजय देसाई  संबोधित करणार आहेत.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. राकेश नलावडे म्हणाले की, या मोर्च्याचा प्रसार रत्नागिरी शहरासह, लगतच्या तालुक्यांमधील गावांमध्येही करण्यात येणार आहे. या मोर्च्याचे वैशिष्ट्य म्हणजे कुणा एका संघटनेने हा मोर्चा आयोजित केलेला नसून समाजातील सर्व हिंदूंनी एकत्र येऊन या मोर्च्याचे आयोजन केलेले आहे. या मोर्च्याच्या प्रसारात आणि प्रत्यक्ष मोर्च्यात सर्व हिंदु बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे.

या बैठकीला सर्वश्री संजय जोशी, श्रीरंग प्रभुदेसाई, राजू तोडणकर, गजानन करमरकर, दीपक देवल, मंदार देसाई, हिमांशु देसाई, तेजस साळवी, गणेश गायकवाड, दीपक जोशी यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, मंडळे, ज्ञाती संस्था आदींचे १०० प्रतिनिधी उपस्थित होते.