#Exclusive : फोंडा (गोवा) येथील कदंब बसस्थानक : एक दुर्लक्षित वास्तू !
श्री. अभिजित नाडकर्णी, फोंडा, गोवा.
फोंडा (गोवा) – गोवा राज्याची ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून गणल्या गेलेल्या फोंडा तालुक्यातील कदंब बसस्थानक हे मध्यवर्ती आणि वर्दळीचे ठिकाण ! राज्यातील विविध शहरे, तालुक्यातील गावे यांना जोडणारी आणि आंतरराज्य बस वाहतूक या ठिकाणावरून होत असते. वर्ष २०२२ च्या मध्यात कदंब बसस्थानक वापरासाठी असुरक्षित घोषित करण्यात आल्यानंतर या स्थानकाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. कंत्राटदार मध्येच काम सोडून गेल्याने हे नूतनीकरणाचे काम गेले ५ मास बंद आहे. कदंब बसस्थानक असुरक्षित घोषित करण्यात आल्याने स्थानकाजवळ प्रवाशांसाठी एका निवारा शेड बांधण्यात आली आहे. ही शेड अपुरी असल्याने आणि तेथे प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी मूलभूत सुविधा नसल्याने त्यांना ताटकळत उन्हात बसची वाट पहात उभे रहावे लागत आहे. पावसाळा काही मासांवर येऊन ठेपल्याने बसस्थानकावर बसची वाट पहात थांबणाऱ्या प्रवाशांची स्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता आहे. सरकारमधील १२ पैकी ४ मंत्री फोंडा तालुक्यातील आहेत. तरीही ‘फोंडा येथील कदंब बसस्थानक एक दुर्लक्षित वास्तू राहिली आहे’, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ‘सरकार कोट्यवधी रुपयांचे नवनवीन प्रकल्प उभारते; मात्र अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांची डागडुजी करण्यात सरकारला रस का नसतो ?’, असाही प्रश्न जाणकार विचारत आहेत.
१. बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम ५ मास झाले ठप्प !
सप्टेंबर २०१५ मध्ये बसस्थानकाच्या छताच्या आतील सुशोभिकरणासाठी वापरलेले ४ मीटर लांबीचे सिमेंटचे २ ‘बीम’ खाली कोसळले. हा प्रकार २ वेळा घडला; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर वर्ष २०२२ च्या मध्यात सरकारने हे बसस्थानक वापरण्यासाठी असुरक्षित असल्याचे घोषित करून बसस्थानकाचे १ कोटी १० लाख रुपये खर्चून नूतनीकरण करणार असल्याचे घोषित केले. नूतनीकरणाचे काम मुंबईस्थित ‘टॅकटोन कन्स्ट्रक्शन’ यांना देण्यात आले. याच आस्थापनाला पणजी येथील कला अकादमीच्या डागडुजीचे कामही देण्यात आले. वर्ष २०२२ च्या नोव्हेंबर मासात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पूर्वी कदंब बसस्थानकावर काम करणाऱ्या कामगारांना संबंधित कंत्राटदाराने कला अकादमीच्या कामासाठी नेले आणि तेव्हापासून बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम बंद आहे. वास्तविक नूतनीकरणाचे काम चालू झाल्यानंतर पुढील ४ मासांत ते पूर्ण करायचे होते. सध्या बसस्थानकाची स्थिती दयनीय झाली आहे.
२. कदंब बसस्थानकाच्या डागडुजीकडे सरकारचे दुर्लक्ष ! – राजेश नाईक, माजी सरपंच, बांदोडा ग्रामपंचायत
याविषयी बांदोडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेश कवलेकर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला म्हणाले, ‘‘सरकारने मागील ३० वर्षे कदंब बसस्थानकाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले आहे आणि यामुळे बसस्थानकाचे छप्पर अन् रस्ते यांची स्थिती दयनीय झाली आहे. बसस्थानकाचे सध्या करण्यात आलेले दुरुस्ती कामही अल्प दर्जाचे आहे. दुरुस्ती कामासाठी आणलेले साहित्य सध्या वापरण्यायोग्य राहिलेले नाही. येथे प्रवाशांसाठी योग्य निवारा शेड नसल्याने ते झाडाच्या सावलीचा आसरा घेतात. बसस्थानक परिसरात सुमारे २० दुकाने आहेत; मात्र बसस्थानकाचा वापर अल्प प्रमाणात होत असल्याने दुकाने गेली दीड वर्षे तोट्यात आहेत. येथील गटारव्यवस्था ३० वर्षे जुनी असून ती तुंबलेली आहेत. यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी वाहून जात असल्याने रस्त्याची फार वाईट स्थिती झाली आहे. बसस्थानकाच्या दयनीय स्थितीमुळे सध्या काही खासगी बसचालक बसस्थानकावर न येता मुख्य रस्त्यावरून प्रवाशांना घेऊन फोंडा शहरात जातात. बसस्थानकावर पथदीपही अल्प आहेत. सरकारने नुकतेच कुर्टी बगलमार्गावर उड्डाणपूल बांधला आहे आणि हा बांधतांना कदंब बसस्थानकाला जोडणाऱ्या रस्त्याचा विचार झाला नाही. यामुळेही बसगाड्या कदंब बसस्थानकावर येत नाहीत. सरकारने हा बसस्थानक मोडून या ठिकाणी आधुनिक असे नवीन बसस्थानक उभारावे.’’
३. नागरिकांची मूलभूत आवश्यकता असलेले बसस्थानक असुरक्षित ! – स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया
सध्या कदंब बसस्थानकावर शौचालय नसल्याने लोक उघड्यावरच नैसर्गिक विधी करतात. या ठिकाणी रात्रीच्या वेळी काळोख असल्याने अनैतिक प्रकारांना थारा मिळत आहे. सरकारने कदंब बसस्थानकावर सरकारी कागदपत्रे नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून अद्ययावत ‘माहिती घर’ उघडले होते. हे ‘माहिती घर’ जेमतेम ६ मास चालले; मात्र बसस्थानक असुरक्षित झाल्यानंतर हे ‘माहिती घर’ अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले. यामुळे ‘माहिती घरा’च्या उभारणीसाठी खर्च केलेले लाखो रुपये वाया गेले. सरकार जवळच्या बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानाच्या सुशोभिकरणावर अडीच कोटी रुपये खर्च करत आहे. या प्रकल्पाचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ होणार असल्याचे म्हटले जात आहे; मात्र सरकार सहस्रो नागरिकांची मूलभूत आवश्यकता असलेल्या बसस्थानकाच्या नूतनीकरणाकडे दुर्लक्ष करते, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
४. प्रवाशांसाठीच्या शेडमध्ये गुरांचा वावर !
‘गोवा कॅन’ या सामाजिक संस्थेजे समन्वयक रोनाड मार्टीन्स म्हणाले, ‘‘फोंडा कदंब बसस्थानकाची स्थिती पाहून धक्का बसला. बसस्थानकाची सरकारने तातडीने डागडुगी केली पाहिजे. प्रवाशांना बसण्यासाठी किंवा उभे रहाण्यासाठी पुरेशी जागा नाही. प्रवाशांना बसण्यासाठी बांधलेल्या ‘शेड’मध्ये गुरे जाऊन बसत आहेत. या ‘शेड’मध्ये लोकांना बसण्यासाठी जुन्या कदंब बसगाड्यांचे ‘सीट’ ठेवले आहेत आणि हे सीट फाटल्याने त्याचा वापर करणेही कठीण झाले आहे. शेडला बांबू लावलेले आहेत. लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे.’’
बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवा !आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती कदंब ट्रानस्पोर्ट कॉर्पोरेशनच्या ‘@KadambaLimited’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावरही पाठवा. |