सावरकरांविषयी अचानकपणे विरोध पहाण्यास मिळतो ! – प्रिया बेर्डे, प्रदेशाध्यक्षा, सांस्कृतिक विभाग
पुणे येथे आयोजित ‘आम्ही सारे सावरकर’ कार्यक्रम
पुणे – आपण सर्वजण लहानपणापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी वाचत आलो आहोत; पण अचानकपणे सावरकरांविषयी विरोध पहाण्यास मिळतो. हे पाहिल्यावर धक्का बसतो; पण समाजात विरोधाला विरोध करणे, ही एक वृत्ती झाली असून त्या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करते, अशी भूमिका भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी मांडली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारकडून राज्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव’ यात्रा चालू करण्यात आली आहे. पुण्यातील डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक परिसरात प्रिया बेर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ‘आम्ही सारे सावरकर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
प्रिया बेर्डे पुढे म्हणाल्या की, सध्याची परिस्थिती लक्षात घेता ‘आम्ही सारे सावरकर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर हे समाजातील प्रत्येक घटकाला नक्कीच समजतील. तसेच सावरकरांविषयी जे काही साहित्य आहे, ते सर्वांनी वाचले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.