सनातनचे मंगळुरू, कर्नाटक येथील पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ५ वर्षे) यांच्या सत्संगात सौ. निवेदिता जोशी यांना आलेल्या अनुभूती !
ठाणे येथील सौ. निवेदिता जोशी या एप्रिल २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्या असतांना त्यांना पू. भार्गवराम प्रभु यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. पू. भार्गवराम प्रभु यांचे रामनाथी आश्रमात आगमन झाल्यावर वातावरणात वेगळेच चैतन्य कार्यरत होणे आणि त्यांनी बाललीला करून साधकांना आनंद देणे
‘एप्रिल २०२२ मध्ये पू. भार्गवराम प्रभु यांचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले. मी पहिल्यांदाच त्यांना पहात होते. त्यांचे दैवी सत्संगात आगमन होताच वातावरणात चैतन्य पसरले. त्यांच्याकडे बघून मला आनंद वाटत होता. ते अतिशय सहजभावात होते. त्यांच्या ६ – ७ दिवसांच्या वास्तव्यात ‘आश्रमात श्रीकृष्ण बाललीला करून साधकांना आनंद देण्यासाठी आला आहे’, असे मला वाटले.
२. पू. भार्गवराम यांच्यासाठी भजन म्हटल्यावर स्वतःचे अस्तित्व न जाणवता आनंद मिळणे
१४.४.२०२२ या दिवशी मी पू. भार्गवराम यांच्यासाठी भजन म्हटले. त्यातून मला फार आनंद मिळाला. तेव्हा ‘जणूकाही कृष्णच माझे भजन ऐकत आहे आणि मला प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मला माझे अस्तित्व न जाणवता केवळ पू. भार्गवराम दिसत होते. ‘श्रीकृष्ण भक्तांच्या प्रेमळ बंधनात स्वतःला बांधून घेऊन आनंद लुटतो’, तसा आनंद मला होत होता. भजन मराठीत असूनही पू. भार्गवराम यांना त्याचा भावार्थ कळला. (पू. भार्गवराम यांची मातृभाषा कन्नड आहे)
३. भजन म्हणत असतांना पू. भार्गवराम यांनी ‘साधिकेला नावेत बसवून स्वतः नाव चालवण्याची’ कृती करून दाखवणे आणि या बाललीलेने सर्वांना निखळ आनंद मिळणे
भजनाच्या शेवटी ते माझ्यापुढे पाय पसरून बसले. मी त्यांना म्हटले, ‘‘पू. दादा, तुम्ही दुडूदुडू पळालात; म्हणून पाय दुखतात ना ? तुमचे पाय चेपून देऊ का ?’’ त्यांनी ‘हो’ म्हटले. मी त्यांचे पाय चेपले. त्यातून मला आध्यात्मिक लाभ होऊन होऊन माझे पाय दुखत होते, ते दुखायचे थांबले. त्यांच्या पायांचा स्पर्श मला मुलायम लागत होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बाललीला चालू केल्या. ते एका ठिकाणी बसत नव्हते. त्यांची आई त्यांना कन्नड भाषेतून म्हणाल्या, ‘‘तुम्ही असे केले, तर काकू भजन म्हणणार नाहीत. आपल्याला खोलीवरही जायचे आहे. बसची वेळ झाली आहे.’’ मी म्हटले, ‘‘मी भजन म्हणणार नाही.’’ या प्रसंगात ‘गोपी कशा कृष्णावर खोटे-खोटे रुसायच्या’, तो क्षण अनुभवण्याची संधी देवाने मला दिली. त्यात एक वेगळाच आनंद होता. पू. भार्गवराम अगदी समजूतदारपणे त्यांच्या आईच्या मांडीवर बसून मला म्हणाले, ‘‘तू भजन म्हण.’’ मी परत भजन म्हणायला आरंभ केला. त्या वेळी ‘बसण्यासाठी जी चटई होती, ती म्हणजे नाव (होडी) आहे आणि त्या नावेत मी बसले आहे’, असा भाव ठेवायला सांगितला. तेव्हा ते स्वतः नाव चालवत आहेत’, अशी कृती त्यांनी केली. त्या वेळी आम्हा सर्वांना निखळ आनंदाची प्राप्ती झाली.
दुसर्या दिवशी पू. भार्गवराम त्यांच्या घरी परत जाणार होते. भजन म्हटले, त्या दिवशी मला हे ठाऊक नव्हते. त्या वेळी गुरुदेवांचे हे नियोजन होते आणि त्यांनी तो विचार देऊन कृती करवून घेतली. याबद्दल सर्वज्ञानी आणि सर्वसाक्षी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), ठाणे. (१८.४.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |