चिपळूण येथे आशुतोष बापट यांच्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे प्रकाशन
कोकणातील मूर्तीवर लेखन होतेय ही चांगली गोष्ट ! – ज्येष्ठ मूर्तीतज्ञ डॉ. गो. बं. देगलुरकर
चिपळूण – मंदिर आणि मूर्ती हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. (व्यवच्छेदक लक्षण म्हणजे काहीतरी आगळे वेगळे अद्वितीय असे लक्षण) त्याकडे आपण अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्या मूर्ती कशाही, भंगलेल्या वगैरे असल्या, तरी त्या आपल्याला काहीतरी सांगून जात असतात. आपल्या संस्कृतीला दोन अंगे आहेत, आधिभौतिक म्हणजे ऐहिक जीवन समृद्ध करणे आणि दुसरी बाजू आधिदैविक अर्थात् तत्त्वज्ञान, अध्यात्म, मंदिर, मूर्ती, कला आदींची असून माणसाचे जीवन समृद्ध होण्याकरता ते आवश्यक आहे. कोकणातील मूर्तीवर लेखन होतेय ही चांगली गोष्ट आहे. कोकण किती समृद्ध आहे ? हे यातून लोकांना कळेल. लोकांचा ओघ कोकणाकडे वाढेल, अशी भावना ज्येष्ठ मूर्तीतज्ञ डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी व्यक्त केली.
येथील ब्राह्मण साहाय्यक संघ सभागृहात आशुतोष बापट यांच्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे प्रकाशन समारंभात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्राचे अभ्यासक लेखक आशुतोष बापट, ज्येष्ठ दुर्गतज्ञ प्र.के. घाणेकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, ज्येष्ठ शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव उपस्थित होते.
मूर्तीतज्ञ डॉ. देगलुरकर पुढे म्हणाले,
१. अलीकडे वाचनालयाला मिळालेली श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती हे चिपळूणच्या वाचनालयाचे भाग्य आहे. इथल्या श्री विंध्यवासिनीदेवीच्या मूर्तीत कलेच्या दृष्टीने २ महिषासुर दाखवलेले आहेत.
२. कोकणातील मूर्ती हा एक मोठा खजिना आहे.
३. जगाच्या पाठीवर इजिप्तची संस्कृती जुनी होती, ती काही लोकांनी गढूळ केली. आज इजिप्तमध्ये प्राचीन संस्कृती नाही.
४. इजिप्तमधल्या मूर्ती आज आपल्याला वस्तूसंग्रहालयात दिसतात, तर भारतातील अनेक मूर्ती आजही लोकांच्या देवघरात आहेत.
पुस्तकाचे लेखक आशुतोष बापट म्हणाले, ‘‘डॉ. गो. बं. देगलुरकर आणि प्र.के. घाणेकर यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे हे लेखन शक्य झाले. सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेचे संग्रहालय कौतुकास्पद आहे. कार्तिकेयाची महाराष्ट्रातील सर्वांत सुंदर मूर्ती चिपळूणच्या श्री विंध्यवासिनी मंदिरात आहे. मूर्तीशास्त्राचा प्रसार आणि प्रचार होण्याची आवश्यकता आहे.’’
दुर्गतज्ञ प्र.के. घाणेकर यांनी सांगितले की, आपल्या स्वतःच्या संग्रहात सगळ्यात जुने पाच-सात लाख वर्षांपूर्वीचे जीवाश्म आहे. ‘चढाई करायला सर्वांत अवघड किल्ला कोणता?’ या प्रश्नाचे उत्तर गमतीने सांगतांना त्यांनी ‘उबरगड’ असे म्हटले आणि लगेचच घराच्या उंबरठ्याबाहेर पडणे महत्त्वाचे असल्याचेही नमूद केले.
कोकणातील पर्यटन कस्तुरीचा गंध आपल्याला येत नसल्याची खंतही त्यांनी या वेळी बोलून दाखवली.
क्षणचित्रे१. चारशे वर्षांपूर्वीच्या श्री लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. २. सुवर्णपदकासह एम्.टेक, पदवी संपादन केलेल्या शुभम् खरे यांचा सत्कार करण्यात आला. ३. ‘सफर चिपळूण गुहागर परिसरा’ची पुस्तकाचा आणि अमृत महोत्सवी सत्कारमूर्ती प्र.के. घाणेकर यांचा परिचय वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी करून दिला. ४. स्नेहल प्रकाशनच्या रवींद्र घाटपांडे यांनी ‘येत्या मे मासात पुणे येथे प्र.के. घाणेकर यांचे आत्मचरित्र ‘जमल तस’ प्रकाशित होत असल्याचे घोषित केले. ५. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा दामले आणि आभार पत्रकार धीरज वाटेकर यांनी मानले. |