भारताचा राष्ट्रध्वज उतरवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर
धारवाड (कर्नाटक) – लंडनमध्ये झालेली घटना (खलिस्तान्यांनी दूतावासावर आक्रमण केल्याचे प्रकरण) नरमाईने घेण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. हा तो भारत नाही, जो कुणीतरी आमचा तिरंगा खाली उतरवण्याचा केलेला प्रयत्न सहन करेल. हा संदेश केवळ त्या तथाकथित खलिस्तान्यांनाच नाही, तर ब्रिटनसाठीही आहे. तो आमचा तिरंगा आहे आणि जर कुणी त्याचा अवमान करण्याचा प्रयत्न करेल, तर आम्ही तो अजून भव्य करू, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ब्रिटनला ठणकावले. येथे भाजपकडून आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. लंडन येथे खलिस्तान्यांनी भारतील उच्चायुक्तालयावरील तिरंगा ध्वज काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना ते बोलत होते.
We've seen incidents in London, Canada, San Francisco, there's a very small minority, behind that minority there are many interests…If they don't provide security then there will be reaction from India. This is not an India that will accept its national flag pulled down…: EAM pic.twitter.com/Vlvfh39at6
— ANI (@ANI) April 2, 2023
डॉ. एस्. जयशंकर पुढे म्हणाले की, जेव्हा आम्ही विदेशात आपल्या देशाचा दूतावास स्थापन करतो, आपले राजनैतिक अधिकारी त्यांचे कर्तव्य तिथे बजावतात, तर त्यांना सुरक्षा पुरवण्याची पूर्ण दायित्व हे त्या देशाचेच असते. याविषयी आमच्या मनात तिळमात्र शंका नाही; कारण आपणही येथे अनेक विदेशी दूतावासांना सुरक्षा पुरवत असतो.
(सौजन्य : TIMES NOW)
जर त्यांनी आपल्या दूतावासांना सुरक्षा पुरवली नाही, जर त्यांनी हे सगळे गांभीर्याने घेतले नाही, जर अशा घटना तिथे घडत असतील, तर मग भारताकडूनही त्यांना उत्तर दिले जाईल, असा दमही डॉ. एस्. जयशंकर यांनी दिला.