सोलापूर शहर बससेवेच्या प्रतीक्षेत !
सोलापूर शहरात महापालिकेच्या शहर परिवहन उपक्रमातील ९९ नव्या कोर्या सिटी बसेसच्या चेसी क्रॅक असल्याने त्या जागेवरच थांबून भंगार झाल्या आहेत. १० वर्षांपूर्वी केंद्रात मनमोहन सिंग यांचे सरकार असतांना शहराला ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहर पुनर्विकास योजने’तून २०० नव्या बसगाड्या संमत झाल्या होत्या. त्यातील १६० बस प्राप्तही झाल्या; मात्र गैरव्यवस्थापनामुळे शहर बस व्यवस्थेची घडी बसली नाही आणि परिणामी सोलापूर शहरातील शहर बससेवाच काहीशी थांबली. सध्या शहरात २०० बसची आवश्यकता असतांना केवळ १७ इतक्याच बस धावत आहेत. नागरिक बसने प्रवास करत नसल्याने परिवहन तोट्यात जात असल्याचे कारण महापालिका परिवहन अधिकारी सांगतात; मात्र पुरेशा बस वेळेत धावत नाहीत. त्यामुळे नागरिकांचा बससेवेवरील विश्वास संपुष्टात येत असून त्यांना अन्य पर्यायांचा वापर करावा लागतो आणि त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. ९९ नवीन बस खरेदीसाठी कोट्यवधी रुपये व्यय करण्यात आले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असले, तरी आता त्या भंगार झालेल्या बसमधून झाडे-झुडुपेही उगवली आहेत. परिवहनच्या या दयनीय स्थितीला उत्तरदायी कोण ? आणि त्या सर्वांनाही शिक्षा होणार का ?
त्यांच्याकडून या चुकांविषयीचे पैसे वसूल केले जाणार का ? असे प्रश्न नागरिकांच्या मनात येत आहेत.
महापालिकेकडे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याचे दायित्व आहे. नागरिकांच्या गरजा पुरवण्यासाठी निधीचे प्रावधान करण्यासाठी महसूल वाढीवरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे; मात्र ‘परिवहन सुधारण्यासाठी महापालिका लक्ष देत नाही’, असेच नागरिकांना वाटते. त्यामुळेच सोलापूर शहर अनेक वर्षांपासून बससेवेच्या प्रतीक्षेत आहे. शहराची ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या अंतर्गत निवड झाली आहे. या योजनेतून परिवहन व्यवस्था सुधारता येऊ शकते. कोणतीही योजना राबवण्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असते. त्यावरून ती योजना यशस्वी होते. नागरिकांसाठी अत्यावश्यक असणारी परिवहन बससारखी महत्त्वाची सेवाही महापालिका पुरवू शकत नसेल, तर ती शहरातील अन्य समस्या, नागरिकांच्या सुविधा यांकडे किती लक्ष देत असेल ? नागरिकांना आहे त्या सुविधा उत्तम प्रकारे का मिळत नाहीत ? याचा अभ्यास न होता नवीन योजनांकडे जाणे योग्य आहे का ? स्मार्ट सिटी म्हणून ओळख लाभलेल्या ‘सोलापूर’ शहरातील परिवहन सेवा सुधारण्यासाठी महापालिकेकडून प्राधान्याने प्रयत्न हवेत.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर