परमोच्च त्याग आणि समर्पण भावना म्हणजे भगवा रंग ! – शरद पोंक्षे, अभिनेते
मोशी (जिल्हा पुणे) येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळा
पुणे – आदर्श कसा असावा ? ते सांगणारे उदाहरण म्हणजे प्रभु श्रीराम आहेत. राजकारण धुरंधर कृती म्हणजे श्रीकृष्ण आहेत. अवतारी पुरुषांनी हातात भगवा घेतला होता. सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळी अवकाश भगवेमय होते. हाती भगवा घेण्यासाठी स्वत:ची आहुती देण्याची सिद्धता असावी लागते. त्याच्याच डोक्यावर भगवी टोपी आणि फेटा शोभून दिसतो. परमोच्च त्याग आणि समर्पण भावना म्हणजे भगवा रंग आहे. कधी राम व्हायचे ? आणि कधी कृष्ण व्हायचे ? हे जाणले, ते छत्रपती शिवाजी महाराज होते. ज्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत समजावले पाहिजे. या विचारांतूनच छत्रपतींनी स्वराज्य घडवले, असे मत अभिनेते आणि हिंदुत्वनिष्ठ विचारवंत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. युवा नेते नीलेश बोराटे यांच्या पुढाकाराने येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अध्यात्मिक गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई, भाजपचे आमदार महेश लांडगे आदींसह ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी पोंक्षे यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतापगडावरील अफझलखान भेटीचा प्रसंग सांगितला. त्या भेटीत छत्रपतींनी अहिंसा किंवा गांधीवादी भूमिका घेतली असती, तर काय झाले असते ? असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी उपस्थितांना केला. निधर्मी राष्ट्राच्या (सेक्युलर) संकल्पनेवरही त्यांनी सडकून टीका केली. ‘देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदु राष्ट्र घोषित होईल’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी आमदार महेश लांडगे म्हणाले की, राज्यातील अनेक नेत्यांनी काही वर्षांपूर्वी क्रांतीवीर सावरकर यांच्या जाज्ज्वल्य इतिहासाविषयी तोंडभरून स्तुती केली. तीच राजकीय मंडळी आज सावरकरांच्या विचारांना विरोध करत आहेत. राजकीय लोकांनी सोयीनुसार समाज, देव आणि अस्मिता वाटून घेतल्या आहेत. त्यामुळे ‘राजकीय लोकांनी व्यासपिठावर बोलतांना इतिहासाचे दाखले देऊ नयेत’, अशी माझी भूमिका आहे.