मुंबईत येत्या १५ दिवसांत उष्णतेची लाट !
मुंबई – मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात एप्रिलमध्ये तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसांमध्येच मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
‘देहलीसह आग्नेय भारतामध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत उष्णतेचे प्रमाण सामान्य राहील; मात्र पूर्वेकडचा भाग, मध्य भारत आणि महाराष्ट्र आत्रण गुजरातच्या पश्चिमेकडील किनारपट्टीच्या भागात एप्रिलमध्ये तापमान सामान्य पातळीपेक्षा अधिक राहील’, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
जागतिक तापमानावर परिणाम करणारा ‘एल् निनो’ सागरी प्रवाह ३ वर्षांनंतर यंदा पुन्हा प्रभावी होण्याची शक्यता आहे. ‘एल् निनो’च्या प्रभावामुळेही वर्ष २०२३ मध्ये तापमानात अचानक प्रचंड वाढ होण्याचा अंदाज आहे. ‘एल् निनो’चा परिणाम मान्सूनच्या वाटचालीवर होतो. त्यामुळे प्रवाहाचा प्रतिकूल परिणाम झाल्यास मान्सून लांबणीवर पडू शकतो.