गोव्यातील मृत्यूपत्राचे प्रकार आणि कलम २१३ !
१. गोव्यामध्ये नोंदवल्या जाणार्या मृत्यूपत्रांचे प्रकार
‘मृत्यूपत्र लिहितांना अनेकदा अनवधानाने काही त्रुटी किंवा चुका होऊन जातात. एकतर कायद्याची पूर्ण कलमे कुणालाच माहिती नसतात. ‘दक्षिण गोवा सेक्सेशन स्पेशल नोटरीज अँड इन्व्हेंटरी प्रोसिडींग्ज ॲक्ट, २०१२’ मध्ये अनेक बारीकसारीक गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. कलम १९६ पासून कलम २४६ यात मृत्यूपत्राच्या संदर्भात सर्व स्पष्टीकरण उपलब्ध होते. या कायद्यानुसार गोव्यामध्ये मुख्यतः ४ प्रकारची मृत्युपत्रे नोंदवली जातात.
अ. सार्वजनिक मृत्यूपत्र (पब्लिक विल)
आ. छापील खुले मृत्यूपत्र (प्रिंटेड ओपन विल)
इ. सीलबंद मृत्यूपत्र (क्लोज्ड् ऑर सिल्ड् विल)
ई. बाहेर केलेले मृत्यूपत्र (विल मेड आऊट साईड)
२. छापील खुले मृत्यूपत्र करण्याचे महत्त्व
गोवा येथे छापील खुले मृत्यूपत्र हे अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असते; कारण या पद्धतीमध्ये मृत्यूपत्र करणार्यांची मानसिक परिस्थिती लक्षात येते. संबंधित व्यक्तीने बलपूर्वक मृत्यूपत्र केलेले नाही, हेही लक्षात येते. संबंधित व्यक्तीने त्याच्या संपत्तीचे नेमके कोण कुणाला आणि काय काय वाटप केलेले आहे, हे मृत्यूपत्र नोंदणी करणार्या व्यक्तीला समजेल, अशा भाषेत मोठ्याने वाचून दाखवण्यात येते. संबंधित व्यक्तीला इंग्रजी भाषा समजण्यास अडचण येत असेल, तर ते त्याला नीट कळणार्या भाषेमध्ये मोठ्याने वाचून दाखवले जाते. यात संबंधिताची मानसिक आणि शारीरिक अवस्थाही समजते. बँक खाते क्रमांक, टपाल खात्याचे बचत खाते क्रमांक, मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट) थोडक्यात आर्थिक बचतीची ठेव नेमकी कुणाकुणाला नावासह देत आहे, हेही कळते. अधिवक्त्यांकडून टंकलेखनाच्या काही त्रुटी झाल्या असतील आणि लिखाण खाली वर झाले असेल, तर तेही लक्षात येते. किंबहुना सर्व काही शांतपणे व्यवस्थित आहे ना, हेही लक्षात येते. कायद्याच्या बाहेर जाऊन चुकीच्या व्यक्तीला, तर काही देत नाही ना, हेही लक्षात येते.
३. मृत्यूपत्र करणार्याच्या आधी संपत्तीच्या वारसाचे निधन झाल्यास त्याविषयीचा तपशील सांगणारे कलम २१३ !
कलम २१३ मध्ये मृत्यूपत्र करणारी व्यक्ती ज्याच्या नावावर संपत्ती करत आहे, त्याचा जर मृत्यूपत्र करणार्याच्या आधीच मृत्यू झाला, तर त्याच्या संपत्तीचे वाटप कसे केले जाते ? याविषयीचा तपशील आहे. पुष्कळदा हा विषय गंभीररित्या लिहिला जात नाही; कारण कोणताही जीव हा बेभरवशाचाच आहे. ‘मी आधी आणि तो नंतर जाणार’, हे सूत्र कोरोना महामारीच्या नंतर गौण ठरू लागले आहे. जे काही लिहिले आहे, ते थोडेफार सशर्त किंवा पर्यायी भाषेमध्ये लिहिलेले कायमच बरे पडते. कलम २१३ जर नीट हाताळले गेले नाही, तर वारसांना त्या परिस्थितीत पुष्कळ कटकटी होतात आणि मृत्युपत्र करणार्याचा हेतु अयशस्वी होतो. अर्थात कुणालाही मृत्यूपत्र केव्हाही, कधीही आणि कितीही वेळा पालटता येते; पुरवणी जोडता येते आणि रहित करता येते. रहित करण्यापेक्षा आधीच्या मृत्यूपत्राला अधिकची पुरवणी सादर करता येते, ज्याला ‘कोडीसिल’, असे म्हणतात. असे केलेले अधिक सोपे आणि सयुक्तिक ठरते.’
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.
हे पण वाचा : सनातन प्रभात
मृत्यूपत्र : कायद्याने मिळालेले वरदान !