गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच कामगारांना कामावर घ्या ! – मुख्यमंत्र्यांचे हॉटेलमालकांना निर्देश
पणजी, १ एप्रिल (वार्ता.) – हॉटेलमालकांनी कामासाठी येणार्या कामगारांची प्रथम पूर्णपणे माहिती घ्यावी. त्यांची पार्श्वभूमी तपासून पहावी. त्याचप्रमाणे कामगाराची नियुक्ती करण्यापूर्वी त्याची कामगार खात्याकडे नोंदणी करावी. कामगारांसाठी कामगार खात्याचे ‘लेबर कार्ड’ असलेल्या लोकांनाच कामावर ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील हॉटेलमालकांना दिले आहेत.
#GoaCM #PramodSawant has asked the managements of all #hotels in #Goa to register their staffers with the #LabourDepartment after two foreign tourists, both women, were assaulted in their hotel rooms.https://t.co/LPGOPSniEx
— The Federal (@TheFederal_News) April 1, 2023
पेडणे येथे एका हॉटेल कर्मचार्याने नेदरलँड येथील एका महिलेवर केलेल्या विनयभंगाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत.
पर्यटकांच्या असुरक्षिततेविषयीच्या चर्चेला उधाण
पेडणे येथे एका हॉटेल कर्मचार्याने नेदरलँड येथील एका महिलेवर केलेल्या विनयभंगाच्या पार्श्वभूमीवर गोवा पर्यटकांसाठी असुरक्षित असल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. २८ डिसेंबर २०२२ या दिवशी जपानच्या पर्यटकाला मारहाण करून त्याचे अंदाजे ९ लाख रुपये लुटले. ५ मार्च २०२३ या दिवशी हणजूण येथे एका हॉटेलमध्ये देशी पर्यटकांवर सशस्त्र आक्रमण करण्यात आले. १६ मार्च २०२३ या दिवशी कामुर्ली येथे एका रस्ता अपघात प्रकरणी एका देशी पर्यटकावर आक्रमण करण्यात आले. २४ मार्च २०२३ या दिवशी हॉटेलमधील दोन कर्मचार्यांनी रशियाच्या महिलेला लुबाडण्यासाठी तिच्यावर आक्रमण केले. पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी अशा घटनांविषयी चिंता व्यक्त केली आहे.