खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीच्या प्रकरणी पुणे येथून एकाला अटक !
लॉरेन्स बिश्नोईवर गुन्हा नोंद !
पुणे – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीच्या नावाने धमकीचा संदेश आला होता. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राहुल तळेकर या संशयित आरोपीला कह्यात घेऊन मुंबई पोलिसांकडे सोपवले आहे. खासदार राऊत यांना ‘दिल्ली में मिल, तुझे एके-४७ से उडा देंगे, सिद्धू मुसेवाला टाइप’ असा धमकीचा संदेश आला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
तळेकर हा एका हॉटेलमध्ये काम करत असून त्याने हे कृत्य कशासाठी केले आहे ? तसेच त्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी नेमका काय संबंध आहे ? याविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत.
संजय राऊत यांना तरुणाने दारूच्या नशेत धमकी दिली असावी ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
‘संजय राऊत यांना तरुणाने दारूच्या नशेत धमकी दिलेली असावी’, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ‘या प्रकरणी अन्वेषण केले जाईल. महाराष्ट्रात कुणीही कुणाला धमकी देत असेल, तर सरकार शांत बसणार नाही. त्या व्यक्तीवर कारवाई होईल. धमक्यांविषयी चेष्टा करण्याचे कोणतेही कारण नाही’, असेही फडणवीस म्हणाले.
‘विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आम्हाला आलेल्या धमक्यांची चेष्टा करतात’, असा आरोप खासदार राऊत यांनी केला होता.
संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीच्या प्रकरणी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्यावर कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.