संभाजीनगर येथे विहिरीसाठी अधिकार्याने लाच मागितल्याने सरपंचाने पैसे उधळत केले आंदोलन !
छत्रपती संभाजीनगर – शेतकर्यांच्या विहिरी संमत करून घेण्यासाठी जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समितीसमोर ३१ मार्च या दिवशी पैसे उधळत अनोखे आंदोलन केले. विहिरीला संमती देण्यासाठी गटविकास अधिकारी १२ टक्के लाच मागत आहेत, असा आरोप करून ‘तीच रक्कम मी येथे घेऊन आलो आहे. आणखी रक्कम लागली तर शेतकर्यांसमवेत जमा करून देतो’, असा संतापही सरपंच साबळे यांनी व्यक्त केला. (शेतकर्यांसाठी विहीर बांधून देण्यासाठी १२ टक्के लाच मागणार्या अधिकार्यांना त्वरित बडतर्फ करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे, तरच असे भ्रष्टाचाराचे प्रकार थांबतील. – संपादक)
नेमके काय प्रकरण आहे ?
गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे म्हणाले, ‘‘माझ्या गावात विहिरीचे २० प्रस्ताव आले आहेत. या कामाला संमती देण्यासाठी गटविकास अधिकारी १२ टक्के लाचेची रक्कम मागत आहेत. बुधवारी कनिष्ठ अभियंता गायकवाड, ग्रामरोजगार सेविकासमवेत गटविकास अधिकारी यांची भेट घेतली. तेव्हा मी आणलेले १ लाख रुपये न घेता मला कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर माझ्याकडे कनिष्ठ अभियंता आणि रोजगार सेवक यांना पाठवून १२ टक्के प्रमाणे रकमेची मागणी करण्यात आली. यामुळे २ लाख रुपये घेऊन मी कार्यालयात आलो; पण या कर्मचार्यांनी पैसे घेतले नाहीत.’’
त्यानंतर संतप्त झालेले सरपंच मंगेश साबळे यांनी तब्बल २ लाख रुपये फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उधळत पंचायत समितीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला. पैशांची माळ गळ्यात घालत ‘आर्थिकदृष्ट्या त्रस्त शेतकर्यांकडून आणखी पैसे हवे असतील, तर जमा करून आणून देतो’, असे साबळे यांनी म्हटले आहे. हा प्रकार घडत असतांना अनेक नागरिकांनी याचे चित्रीकरण करण्यास प्रारंभ केला. तिथे उपस्थित असलेल्या काही मुलांनी नोटा घेत तिथून पोबारा केला. या आंदोलनानंतर सरपंच साबळे यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर पसरला आहे. (सरपंच मंगेश साबळे यांनी असे अनोखे आंदोलन करून भ्रष्ट कारभार बाहेर काढल्याविषयी त्यांचे अभिनंदन ! आता साबळे यांनी ग्रामस्थांना संघटित करून भ्रष्ट अधिकारी बडतर्फ होईपर्यंत वैध मार्गाने लढा द्यावा. – संपादक)
संपादकीय भूमिका
|