साधकांनो, सुखोपभोगांत रममाण होऊन साधनेची हानी करून घेऊ नका !
‘काही साधक दिवसभर साधना करतात आणि रात्री झोपण्यापूर्वी मन अन् बुद्धी यांना सुखद पालट मिळावा म्हणून भ्रमणभाषवर मनोरंजनपर कार्यक्रम पहातात. काही साधक नकारात्मकता किंवा निराशा घालवण्यासाठीही हा मार्ग अवलंबतात. काही साधक मध्ये मध्ये भूतकाळातील सुखद प्रसंग आठवत रहातात किंवा भविष्यातील सुखद कल्पनांच्या मनोराज्यात रमतात. ‘भूतकाळ किंवा भविष्यकाळ यांत मनाला रमवणे’ म्हणजे, ‘वर्तमानकाळातील परिस्थती स्वीकारता न येणे’. सध्या तीव्र आपत्काळ चालू असल्याने अनिष्ट शक्तींचा जोर वाढला असून त्याही साधकांचे मन आणि बुद्धी यांवर आवरण आणून त्यांना वरील प्रकारे मायेत रममाण करण्यासाठी प्रयत्न करतात.
सुखोपभोगांत रममाण होण्यामुळे मन विकारग्रस्त होते, वृत्ती बहिर्मुख होते, तसेच देह, मन अन् बुद्धी यांवर रज-तमात्मक आवरण येते. या सर्वांमुळे अनिष्ट शक्तींचा त्रासही वाढतो. ‘ईश्वरप्राप्ती’, या एकमेव उद्देशाने साधकांनी साधनेला आरंभ केलेला असतांना त्यांनी ‘सुखोपभोगांत रममाण होणे’, म्हणजे साधनेच्या मूळ उद्देशापासून दूर जाणे होय.
‘मन आणि बुद्धी यांना सुखद पालट मिळावा, यासाठी मनोरंजनपर कार्यक्रम पहाणे किंवा मनोराज्यात रमणे’, याचा अर्थच हा आहे की, साधना आणि सेवा यांतून आपल्याला तेवढा आनंद मिळत नाही. सुखोपभोगांच्या अधीन झाल्यामुळे आपण खर्या आनंदापासून आणखी दूर जातो. खरे पहाता साधना आणि सेवा यांतून मिळणार्या आनंदाने मन भरून गेले की, बाह्य सुखाकडे ते धाव घेणारच नाही. त्यामुळे साधनेचे प्रयत्न आणि आपण करत असलेली प्रत्येक सेवा, अगदी प्रसाधनगृह स्वच्छ करण्याची सेवासुद्धा, यांतून आनंद घ्यायचा प्रयत्न करायला हवा.
जेव्हा मन आणि बुद्धी यांना पालट हवा असतो, तेव्हा संतांच्या भजनांत मनाला रमवणे, नामजप एकाग्रतेने करून त्यातून आनंद घ्यायचा प्रयत्न करणे, लहान लहान भावप्रयोग (उदा. ‘गुरूंचा हात माझ्या मस्तकावर आहे’, असा भाव ठेवणे) करणे यांसारख्या कृती करून भगवंताच्या अनुसंधानात रहायचा प्रयत्न करावा. हे प्रयत्न साध्य होण्यासाठी आवश्यकतेनुसार मनाला स्वयंसूचनाही द्याव्यात. आध्यात्मिक त्रासामुळे मन मायेकडे ओढले जात असेल, तर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावेत किंवा वाढवावेत.
मनावर अनेक जन्मांपासून असलेल्या संस्कारांमुळे मन मायेतील गोष्टींमध्ये सुख शोधायचा प्रयत्न करत असते. आपण मनाला प्रयत्नपूर्वक भगवंताच्या अनुसंधानात गुंतवले की, हळूहळू मनाला त्या प्रयत्नांतून आनंद घ्यायची सवय लागते. असे झाले की, मन मायेतील सुखांकडे वळत नाही.
साधकांनो, दिवसभर साधनेच्या प्रयत्नांतून मिळवलेल्या चैतन्याचा व्यय वरील प्रकारे मायेतील गोष्टींमध्ये होऊ लागला, तर आपली साधनेत प्रगती कशी होईल ? यासाठी सुखोपभोगांत रममाण होऊ नका ! त्याऐवजी साधना वाढवा आिण साधनेतूनच आनंद मिळवा ! आपल्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे ‘मोक्षगुरु’ लाभले आहेत, याचा लाभ करून घेऊन याच जन्मात मोक्षप्राप्ती करून घ्या !’
– (पू.) संदीप आळशी (६.३.२०२३)