बंगालमध्ये राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना पोलीस ठाण्यात मारहाण

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो

कोलकाता – राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो हे बंगाल दौर्‍यावर असतांना त्यांना तिलजला पोलीस ठाण्यात पोलिसांनी मारहाण केली. तिलजला येथे एका ७ वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी कानूनगो तिलजला येथे गेले होते. ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिस्वक मुखर्जी यांनी मला मारहाण केली.

हत्येच्या प्रकरणाची कार्यवाही चालू असतांना पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्याचे गुप्तरित्या ध्वनीचित्रीकरण केले. त्याला मी विरोध केल्यानंतर मुखर्जी यांनी मला मारहाण केली’, असे कानूनगो यांनी सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष शुभेंदु अधिकारी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले,

‘राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग ही वैधानिक संस्था आहे. बालहक्क कायद्याच्या अंतर्गत त्याची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाच्या अध्यक्षांना पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात येते, यावरून बंगालच्या कायदा आणि सुव्यस्थेची स्थिती आपल्या लक्षात येते.’

संपादकीय भूमिका

यातून तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ढासळलेली कायदा आणि सुव्यस्था आपल्याला दिसून येते. एका महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षांना पोलीस मारहाण करत असतील, तर ते सामान्य लोकांशी कशा प्रकारे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा !