न्यायालयाने आदेश देऊनही रामनवमीच्या मिरवणुकीला चेन्नई पोलिसांनी अनुमती नाकारली !
चेन्नई – रामनवमीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनेला न्यायालयाने अनुमती देऊनही पोलिसांनी अनुमती नाकारली. यामुळे हिंदूंमध्ये संतापाची भावना आहे.
शहरात रामनवमीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यासाठी ‘भारत हिंदु मुन्नानी’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने २८ फेब्रुवारी या दिवशी चेन्नई पोलीस आयुक्त कार्यालयात एक विनंतीअर्ज केला होता. याविषयी १५ दिवस उलटून गेल्यानंतरही काहीच उत्तर न मिळाल्याने ‘भारत हिंदु मुन्नानी’ने अनुमतीसाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. २८ मार्च २०२३ या दिवशी यावर सुनावणी झाली. ‘मिरवणुकीचा मार्ग मुसलमानबहुल भागातून जात असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मिरवणुकीला अनुमती देऊ नये’, असा युक्तीवाद पोलिसांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तीवाद स्वीकारला; मात्र मिरवणुकीसाठी पर्यायी मार्गाला अनुमती देण्याचा आदेश दिला. यावर ‘भारत हिंदु मुन्नानी’ने पर्यायी मार्ग स्वीकारला आणि त्याविषयी अनुमती देण्याची विनंती चेन्नई पोलीस आयुक्तांकडे सुधारित अर्जाद्वारे केली. तरीही ३० मार्च २०२३ या दिवशी मिरवणूक काढण्यास अनुमती नाकारण्यात आली. ‘तमिळनाडूतील द्रमुक सरकारच्या राजकीय दबावापोटी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून चेन्नई पोलिसांनी मिरवणुकीला अनुमती नाकारली’, असे सांगण्यात येत आहे. (राज्यकर्त्यांच्या ताटाखालचे मांजर बनलेले पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? – संपादक) या प्रकरणी पुन्हा न्यायालयात जाण्याचा निर्णय ‘भारत हिंदु मुन्नानी’ने घेतला आहे. तसेच ‘भारत हिंदु मुन्नानी’ने ३० मार्च २०२३ या दिवशी सरकार आणि पोलीस यांच्या विरोधात निदर्शने केली.
संपादकीय भूमिका
|