मंगळसूत्रातील वाट्यांना बगल नको !
आज-काल मंगळसूत्रामध्ये मध्यभागी असलेल्या २ वाट्यांच्या ठिकाणी वेगवेगळे नक्षीदार ‘डिझाईन’ असण्याची, तसेच मंगळसूत्राच्या २ पदरांऐवजी एकच पदर असण्याची ‘फॅशन’ निघाली आहे. मंगळसूत्रातील २ वाट्यांच्या ऐवजी हिर्याचे किंवा मोत्याचे किंवा अन्य कुठल्या धातूचे ‘पेंडेंट’ही पहायला मिळतात.
मंगळसूत्र हा एक महत्त्वाचा सौभाग्यलंकार आहे आणि त्यातील प्रत्येक घटकाला आध्यात्मिक अर्थही आहे. मंगळसूत्रात दोन पदरी दोर्यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी ४ छोटे सोन्याचे मणी अणि २ लहान वाट्या असतात. ४ छोटे मणी हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या ४ पुरुषार्थांचे, तर २ वाट्या म्हणजे शिव-शक्तीचे प्रतीक आहे. मंगळसूत्राच्या वाट्यांच्या पोकळीतील तेजस्वरूप लहरींमुळे विवाहित महिलेचे अनाहतचक्र जागृत होते. अलंकारातील तेजामुळे स्त्रीचे रज-तम लहरींपासून, तसेच नकारात्मक स्पंदनांपासून संरक्षण होते. अलंकार परिधान करण्यामागे केवळ चांगले दिसणे किंवा नटणे हा उद्देश नाही, तर अलंकारांमुळे व्यक्तीला आध्यात्मिक ऊर्जा मिळते. त्यामुळे हे अलंकार जेवढे शास्त्रानुरूप असतील, तेवढा त्याचा व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो.
समजा भात बनवतांना त्यात तांदूळ आणि पाणी यांचे प्रमाण योग्य झाले, तरच तो व्यवस्थित होऊ शकतो. ‘फॅशन’ म्हणून कुणी तांदळामध्ये भरमसाठ पाणी घातले, तर भात चांगला होणार नाही, तसेच ‘फॅशन’ म्हणून आपण धर्मशास्त्रीय संकल्पनेत मनमानी पालट केले, तर ते योग्य होणार नाहीत. त्यामुळे वाट्यांविरहित मंगळसूत्रांना ‘मंगळसूत्र म्हणायचे कि मंगळसूत्रसदृश गळ्यातील अलंकार ?’, हाही एक प्रश्न आहे.
धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने महिलांकडून नको तेथे ‘फॅशन’चा आग्रह धरला जातो. ‘फॅशन’चा अट्टहास सोडून धर्म, परंपरा काय आणि तसे का सांगते ? हे जाणून घेणे आणि त्यानुरूप कृती करणे महत्त्वाचे आहे. ‘फॅशन’ म्हणून मंगळसूत्रातील ‘वाट्यांना फाटा’ दिला, तरी त्यामुळे मंगळसूत्राच्या माध्यमातून ‘सूक्ष्म संरक्षककवच’ निर्माण होण्याच्या वाटेलाच बगल दिली जात आहे !
– सौ. गौरी कुलकर्णी, फोंडा, गोवा.