जावेद अख्तर न्यायालयात अनुपस्थित !
रा.स्व. संघाची तालिबानशी तुलना केल्याचे प्रकरण
मुंबई – चित्रपट सृष्टीतील पुरोगामी गीतकार जावेद अख्तर यांनी काही मासांपूर्वी रा.स्व. संघाची तुलना तालिबानशी केली होती. या प्रकरणी मुलुंड न्यायालयात त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला नोंद करण्यात आला होता. त्यावरील ३१ मार्च या दिवशी होणाऱ्या सुनावणीला अख्तर उपस्थित राहू न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या पुढची २० तारीख देण्यात आली असून जावेद अख्तर न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला जाण्याची शक्यता आहे. ‘ज्या पद्धतीने तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्या पद्धतीने आपल्याकडे काहीजण हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडतात. आर्.एस्.एस्., बजरंग दल आणि तालिबान यांसारख्या संघटनांच्या ध्येयांमध्ये कोणताही भेद नाही. दोघांची मानसिकता सारखीच आहे. या संघटनांच्या ध्येयाच्या मार्गात भारतीय संविधान एक अडथळा बनत आहे; परंतु जर संधी मिळाली, तर ते घटनात्मक सीमाही ओलांडतील’, असे विधान अख्तर यांनी केले होते.