छत्रपती शिवरायांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे !
खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली मागणी !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्मसमभावाच्या धोरणाला काही कुटील प्रवृत्ती सुरूंग लावतांना दिसत आहेत. त्यातून वादंग उठत असून महाराजांचा सातत्याने अवमान होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज यांचा अधिकृत इतिहास जगापुढे येण्याची आवश्यकता आहे. यासाठी छत्रपती शिवरायांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करण्यात यावे, अशी मागणी छत्रपती शिवरायांच्या सातारा येथील गादीचे वंशज उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. नुकतीच उदयनराजे भोसले यांनी नवी देहली येथे अमित शहा यांची प्रत्यक्ष भेट घेतली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अधिकृत चरित्र प्रकाशित करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडला पाहिजे. हा इतिहास खंडरूपात, तसेच विविध भाषांमध्ये प्रकाशित करावा. हे काम गुणवत्तेच्या आधारावर झाले, तर इतिहासाची मोडतोड करण्याच्या प्रयत्नांना पायबंद बसेल आणि सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, असे भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी कायदा करावा !
छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांचा कुणी अवमान करत असेल, तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी येत्या अधिवेशनात राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा संमत करावा, अशी मागणी उदयनराजे यांनी अमित शहा यांच्याकडे केली. यावर कायदेतज्ञ आणि अभ्यासक यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन अमित शहा यांनी दिल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती व्हावी !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित महत्त्वाची ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, चित्रे परदेशातील विविध संग्रहालयातून भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय स्मारक असणे आवश्यक आहे. शिवरायाचे चरित्र आणि कार्य जगासमोर नेण्यासाठी, तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी देहली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारका’ची निर्मिती करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी या वेळी केली.
या सर्व मागण्यांसाठी लवकरच चर्चा करू, असे आश्वासन अमित शहा यांनी दिल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका‘सर्व धर्मांचा आदर करणे’ ही हिंदु धर्माची शिकवण आहे. त्यामुळे हिंदु धर्मातील राजांनी सत्ता बळकावण्यासाठी अन्य धर्मियांवर आक्रमण केले नाही; परंतु हिंदु धर्मावर आक्रमण करणार्या धर्मांधांचा बिमोड करून छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे. त्यामुळे इतिहासाची मांडणी करतांना उगाचच सर्वधर्मसमभावाचा वांझोटा बागुलबुवा करून छत्रपती शिवरायांची ‘हिंदुपतपादशहा’ ही ओळख पुसणार नाही, याची दक्षता शासनाने घ्यावी ! |