खडकवासला (पुणे) धरणालगत सापडले गावठी दारूचे ४० बॅरेल !
पुणे – पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणाच्या शेजारीच ओसाडे (ता. वेल्हे) गावच्या परिसरात पुणे-पानशेत रस्त्यापासून केवळ ५० ते १०० मीटर अंतरावर डोंगरकपारीत गाडलेले कच्च्या गावठी दारूचा साठा असलेले ४० बॅरेल आढळले; मात्र अनेक वर्षांपासून राजरोसपणे गावठी दारूची भट्टी चालू असून पोलिसांना याविषयी माहिती असतांना जाणीवपूर्वक कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. (असे असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. आता नागरिकांनीच याचा पाठपुरावा घ्यायला हवा ! – संपादक)
रात्रीच्या वेळी अगदी पाण्याला लागून दारू गाळण्याचे काम चालू असते. या दारू विक्रेत्यांची परिसरामध्ये दहशत असल्याने पोलिसही त्यांना सामील आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे. ज्या ठिकाणी ही दारूची भट्टी आहे, तेथील परिसरात कुजलेल्या कच्च्या दारूची उग्र दुर्गंधी येत असते, तसेच धरणाच्या पाण्यात आणि कडेने कोळशांचा खच पडलेला आहे. सांडलेले कच्च्या दारूचे रसायन, इतर घाण ही थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात मिसळत आहे.
वेल्हे पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार म्हणाले की, तातडीने संबंधित ठिकाणी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले आहे. तेथील दारूचा साठा नष्ट करण्याचे काम चालू आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात येत असून संबंधित आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात येईल.
संपादकीय भूमिकाएवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी दारू कशी येते ? हे सुरक्षा व्यवस्थेला का समजत नाही ? याचा शोध घेणे आवश्यक आहे ! |