लक्ष्मणासारखा बंधू नाही !
चैत्र शुक्ल ११ या तिथीला लक्ष्मणाचा जन्म झाला. त्या निमित्ताने…
चैत्र शुक्ल ११ या तिथीला श्रीरामाचा एकनिष्ठ आणि सावलीप्रमाणे समवेत रहाणारा बंधू लक्ष्मण याचा जन्म झाला. दशरथास सुमित्रेपासून झालेला हा मुलगा म्हणजे लक्ष्मण.
राम-लक्ष्मणाची प्रीती ही बंधू-बंधूमधील प्रेमाचे आदर्श स्वरूप म्हणून मानली गेली आहे. प्रभु रामचंद्र वनवासाला निघाले, तेव्हा ऐश्वर्याचा त्याग करून रामासह वनवासास जाण्यास लक्ष्मण सिद्ध झाला. त्या वेळी लक्ष्मण श्रीरामाला म्हणाला, ‘‘मी धनुष्य सज्ज ठेवून आणि कुदळ-खोरी बरोबर घेऊन तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी तुमच्यापुढे राहीन. वनातील कंदमुळे, फळे आणि तपस्व्यांना होमाकरता लागणारे पदार्थ तुम्हाला नित्य आणून देत जाईन.’’ रामाविषयी त्याला जेवढा आदर होता, तेवढीच निष्ठा सीतामातेविषयीही होती. या दोघांची सेवा करणे, ही एकच गोष्ट त्याला ठाऊक होती. ऋष्यमुख पर्वतावर सीतेने टाकलेले दागिने वानरांनी जपून ठेवले होते. ते त्यांनी ओळखण्यासाठी लक्ष्मणाला जेव्हा दिले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘मला कर्णभूषणे, बाहुभूषणे ओळखता येत नाहीत; पण प्रतिदिन सीतामातेला वंदन करतांना पाहिल्यामुळे पायांतील अलंकार तेवढे मी ओळखू शकेन.’’ श्रीरामही त्याची योग्यता जाणून होते. इंद्रजितास लक्ष्मणानेच मारले; पण तत्पूर्वी लक्ष्मण बेशुद्ध झाला असतांना रामचंद्र म्हणाले, ‘‘एक वेळ सीतेसारखी स्त्री मिळू शकेल; पण लक्ष्मणासारखा बंधु मात्र मिळणे कठीण आहे.’’
राम-रावण युद्धात लक्ष्मणाने मोठा पराक्रम केला. अतीकाय, विरूपाक्ष, रावण इत्यादींशी त्याचे प्रत्यक्ष युद्ध झाले होते. अशोक वनात असणार्या सीतेने लक्ष्मणाचे वर्णन केले आहे, ‘‘लक्ष्मण वृद्धांची सेवा करणारा असून समर्थ; परंतु मितभाषी आहे. तो स्वभावाने सौम्य आणि आचरणाने पवित्र आहे. त्याने वेळोवेळी रामालाही सल्ला देण्याचे काम केले आहे.’’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), लेखक – प्रल्हाद नरहर जोशी)