संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर चंदन उटीचा वापर करत शिंदेशाही साज !
आळंदी (जिल्हा पुणे) – डोक्यावर शिंदेशाही पगडी, अंगात भरजरी सदरा, कंबरेला पितांबर आणि चेहर्यावर पिळदार मिशी असा मराठमोळा शिंदेशाही साज देऊन रामनवमीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर महान सेनानी महादजी शिंदे यांचे रूप साकारण्यात आले होते. आळंदी संस्थानच्या वतीने ही प्रथा परंपरा जपली जात असून पुणे येथील शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी ही उटी साकारली. या वेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिंदेशाही अवतार पहाण्यासाठी माऊली भक्तांनी गर्दी केली होती.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आणि पालखी सोहळ्यात महादजी शिंदे यांचे मोठे योगदान असून त्याकाळी संस्थानला शिंदे यांचा राजाश्रय लाभला होता. मंदिरातील विविध बांधकामे शिंदे यांनी बांधलेली असून त्यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून श्रीरामनवमीला मंदिरात प्रथा-परंपरेनुसार त्यांचे चंदन उटीतून रूप साकारण्यात येते.