छत्रपती घराण्याचा अभिषेक वेदोक्त पद्धतीनेच झाला, मंदिरात मंत्र म्हणण्यास कुणालाही आडकाठी नाही !
नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीरदासजी महाराज यांचा खुलासा !
नाशिक, ३१ मार्च (वार्ता.) – छत्रपती घराण्याची पूजा वेदोक्त पद्धतीनेच झाली. छत्रपतींचे घराणे आमच्यासाठी आदरणीय आहे. काळाराम मंदिरामध्ये येऊन कुणीही भगवंताची स्तुती करू शकतो. प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार मंत्र म्हणू शकतो. यासाठी कुणालाही आडकाठी नाही. झालेला प्रकार अपसमजातून झाला आहे. याविषयी लवकरच छत्रपती घराण्याची भेट घेऊन अपसमज दूर करू, असे वक्तव्य श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीरदासजी महाराज यांनी ३१ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
कोल्हापूर येथील छत्रपतींच्या गादीचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांच्या धर्मपत्नी सौ. संयोगिता यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांवर काळाराम मंदिरातील पुजार्यांकडून छत्रपती घराण्याचा अवमान झाल्याची पोस्ट प्रसारित केली. याविषयी महंत सुधीरदासजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती देऊन हा प्रकार अपसमजातून झाल्याचे म्हटले.
याविषयी सविस्तर माहिती देतांना महंत सुधीरदासजी म्हणाले, ‘‘पावणेदोन मासांपूर्वी छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी संयोगिताताई काळाराम मंदिरात आल्या होत्या. त्या वेळी त्या मंदिरामध्ये फिरल्या. मी त्यांना मंदिराविषयी माहितीही सांगितली. छत्रपती संभाजी राजे यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य यांसाठी प्रभु श्रीरामचंद्रांच्या चरणी त्या वेळी संकल्प करण्यात आला. या संकल्पामध्ये ‘श्रुती, स्मृति, पुराणोक्त’ असा शास्त्रानुसार पुण्यप्राप्तीचा संकल्प मी म्हटला. याचा अर्थ ‘श्रुती म्हणजे वेद, स्मृति आणि पुराण यांमध्ये सांगितलेले फळ प्राप्त व्हावे.’ या वेळी त्यांनी ‘पुराण’ या शब्दाला आक्षेप घेऊन ‘आम्ही छत्रपती घराण्यातील आहोत. आमचे पूजन वेदानुसार करण्यात यावे’, असे सांगितले. त्यावर मी त्यांना आदराने ‘‘प्रभु श्रीरामचंद्राचा अभिषेक पुरुष सुक्ताप्रमाणे शुक्ल यजुर्वेदातील ३१ व्या रचनेनुसार केला जातो. ऋग्वेदाच्या १० व्या मंडळामध्ये याची रचना आहे’’, असे सांगितले. त्यानंतर संकल्पाला बसून ताईंनी सर्व पूजन केले आणि प्रसादही स्वीकारून मला दक्षिणाही दिली. पूजेनंतर मी त्यांना गाडीपर्यंत सोडले. ‘त्यांचा कोणत्याही प्रकारे उपमर्द होईल’, असे वक्तव्य मी केले नाही. पूजेच्या वेळी हळदी-कुंकू लावण्याचा मंत्रही वेदोक्त म्हटला. पूजेला प्रारंभही वेदोक्त पद्धतीने करण्यात आला. संकल्प करतांना ‘श्रुती, स्मृति, पुराणोक्त फलप्राप्ती’मध्ये वेदोक्त किंवा पुराणोक्त असे काही येत नाही. संकल्पातील उल्लेखामुळे हा अपसमज झाला असावा. पहिले छत्रपती शाहू महाराज यांच्यासमवेत जी घटना घडली त्याचा काळाराम मंदिरातील पुजारी घराण्याशी काहीही संबंध नाही.’’
या वेळी महंत सुधीरदासजी महाराज म्हणाले, ‘‘संकल्प हा वेदोक्त किंवा पुराणोक्त नसतो. त्यानंतर केलेली पूजा वेदोक्त किंवा पुरोणोक्त असते. काळाराम मंदिरामध्ये सर्व जाती-धर्माच्या नागरिकांसाठी पूजा होते. या वेळी वेदातील श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त यांद्वारेच अभिषेक होतो. संयोगिताताई यांनी मंदिरात बसून रामरक्षा, महामृत्यूंजय मंत्र म्हटला. त्याविषयी कुणीही आक्षेप घेतला नाही. आक्षेप घेण्याचा प्रश्न येतच नाही.’’
छत्रपतींचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पुढे नेण्यासाठीच आम्ही कार्यरत आहोत !
छत्रपती म्हणजे नरांमध्ये अधिपती, जो अभिषिक्त राजा आहे. त्यांना अग्निहोत्र करण्याचा अधिकार शास्त्राने दिला आहे. अग्निहोत्र केल्यानंतर त्या घराण्यामध्ये वेदोक्त पूजा होत असते. छत्रपति घराण्याचा तो अधिकार आहे. तो आम्ही मान्य केला आहे. हा सर्व समाज एकरूप रहावा. छत्रपती शिवरायांची हिंदु राष्ट्राची संकल्पना दृढ व्हावी. छत्रपतींचा हा संकल्प पुढे नेण्यासाठीच आम्ही कार्य करत आहोत, असे या वेळी महंत सुधीरदासजी महाराज म्हणाले.
काय आहे प्रकरण ?छत्रपती संभाजीराजे यांची पत्नी सौ. संयोगिता यांनी श्रीरामनवमीच्या दिवशी सामाजिक माध्यमांवर पुढील संदेश प्रसारित केला आहे. ‘नाशिक येथील काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही ? हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की, ज्या मंदिरामध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचवली कुणी ? छत्रपती यांनी वाचवली. मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. त्यानंतर मी तेथेच रामरक्षा म्हटली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की, १०० वर्षांत ही मानसिकता का पालटली नाही ? अद्यापही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खोलवर रूजवावे लागणार आहे. अद्यापही पुष्कळ प्रवास शिल्लक आहे. पुष्कळ चालावे लागणार आहे, ‘हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे’, असे या संदेशात सौ. संयोगिता यांनी म्हटले आहे. |