#Exclusive : रत्नागिरी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच सोडले जाते मुतारीचे सांडपाणी !
एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमाला ! |
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !
राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.
प्रतिनिधी : श्री. चंद्रशेखर गुडेकर आणि श्री. हर्षद पालये
रत्नागिरी, ३१ मार्च (वार्ता.) – एस्.टी. महामंडळाच्या बसस्थानक स्वच्छता मोहिमेचे तीनतेरा वाजावेत, अशी दयनीय स्थिती रत्नागिरीच्या मुख्य बसस्थानकाची आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात बसस्थानकातीलच मुतारीचे सांडपाणी उघड्यावर सोडले जात आहे. हे दुर्गधीयुक्त सांडपाणी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारे साचले असून त्यातूनच मार्ग काढत प्रवाशांना बसस्थानकात जावे लागते.
१. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर साठलेल्या मुतारीच्या दुर्गंधीयुक्त पाण्यात प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पडला असून दुर्गंधीयुक्त सांडपाणी तुंबले आहे. बसस्थानकामधील प्रसाधनगृह अस्वच्छ आहे.
२. बसस्थानकाचा संपूर्ण परिसर खड्डेमय झालेला आहे. रत्नागिरीमधील मुख्य बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम वर्ष २०१८ मध्ये चालू करण्यात आल्याने तेव्हापासून हे बसस्थानक रहाटघर येथे स्थलांतरित करण्यात आले; परंतु त्याचे स्थलांतर करतांना त्या ठिकाणी प्रवाशांना किमान सुविधा उपलब्ध करणे, प्रवाशांना बसण्याची जागा स्वच्छ नसणे, बसस्थानकाचा परिसर व्यवस्थित करणे या प्राथमिक गोष्टीही करण्यात आलेल्या नाहीत.
३. नवीन बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम अद्याप १० टक्केही झालेले नाही. त्यामुळे आणखी काही वर्षे बसस्थानकाची व्यवस्था रहाटघर येथेच असणार आहे.
४. बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या नळांपैकी केवळ १ नळ चालू असून अन्य ४ नळ बंद आहेत.
५. बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी कुलर बसवण्यात आला आहे; परंतु पाणी घेण्यासाठी भांडे ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना ओंजळीने पाणी प्यावे लागते. परिणामी पाणी खाली सांडून भूमीवर पसरते. त्यामुळे चिखल होतो.
६. अपुर्या संख्येमुळे अनेकदा बसगाड्या सोडण्यासाठी वाहक-चालक उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नियोजित गाड्या आयत्या वेळी रहित कराव्या लागतात. परिणामी बसस्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांना उन्हात ताटकळत उभे रहावे लागते.
७. बसस्थानकावर गाड्यांचे वेळापत्रकही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे नवीन येणार्या प्रवाशांची गैरसोय होते. त्यात गाड्यांची चौकशी करण्यासाठी गेल्यास अनेकदा विचारूनही कर्मचारी गाड्यांची नीट माहिती देत नाहीत.
८. एकंदरित रहाटघर बसस्थानकाची जागा मोजकी असली तरी ५ वर्षांत तेथे प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसस्थानकाच्या परिसरातील खड्डे भरणे, कचर्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन, बसगाड्यांचे वेळापत्रक लावणे आदी प्राथमिक गोष्टीकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवा !आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा. |