दापोली मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा काढणार ! – आमदार योगेश कदम
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही !
दापोली, ३१ मार्च (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांचे जीवनकार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोचवण्यासाठी दापोली विधानसभा मतदारसंघात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार योगेश कदम आणि भाजपचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दिली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर, श्रीराम ईदाते, शिवसेनेचे सुधीर कालेकर, प्रदीप सुर्वे, भगवान घाडगे, नीलेश शेठ यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार योगेश कदम पुढे म्हणाले,
१. सावरकर यांचे जीवनकार्य थोर आहे. राहुल गांधी यांनी चुकीची वक्तव्ये करून त्यांचा अपमान केला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.
२. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध सोडाच; मात्र आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेत त्यांना जाऊन मिठी मारली.
३. उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या सूत्राशी काँग्रेससमवेत तडजोड केली, हे चुकीचे आहे.
४. सर्वधर्माच्या लोकांनी या गौरव यात्रेत सहभागी व्हावे, यामध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, याची खबरदारी विरोधकांनी घ्यावी.
५. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर यापुढे राहुल गांधी बोलणार नाहीत; मात्र त्यांनी यापूर्वी केलेल्या अपमानाचे काय? त्यांनी सावरकरांचा अपमान केल्यावर उद्धव ठाकरे यांनी आंदोलन का केले नाही?
सावरकरांच्या नावाने चालू असणारे घाणेरडे राजकारण तात्काळ थांबवावे ! – केदार साठे
या गौरव यात्रेत सावरकरांचे कार्य, त्यांचे विचार लोकांसमोर मांडण्यात येतील. सावरकरांच्या नावाने चालू असणारे घाणेरडे राजकारण तात्काळ थांबवावे, असे आवाहन भाजपचे केदार साठे यांनी या वेळी केले.