२० साक्षीदार म्हणतात, ‘‘साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या भ्रष्टपद्धतीने केलेले बांधकाम !’’
साई रिसॉर्ट प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आरोप !
मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दापोली तालुक्यातील मुरूड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर आता पुन्हा एकदा आरोप केले आहेत. या प्रकरणात सध्या अनिल परब यांना न्यायालयीन संरक्षण मिळाले असले, तरी या प्रकरणाचे ‘ईडी’कडून अन्वेषण अद्याप चालू आहे. ‘परब यांनी दापोली येथे समुद्र किनार्यावर ‘सी.आर्.झेड.’, नागरी विकास क्षेत्र (नो डेव्हलपमेंट झोन)मध्ये बांधलेला ‘साई रिसॉर्ट’ हा अनधिकृत आहे. स्वतःच्या मंत्रीपदाचा दुरुपयोग करून सरकारी अधिकार्यांवर दबाव आणून भ्रष्टपद्धतीने सी.आर्.झेड आणि नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बांधकाम केले आहे, असे विधान २० साक्षीदारांनी केले. ज्यात अनिल परब यांचे मित्र, भागीदार, सरकारी अधिकारी सहभागी आहेत’, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
१. सोमय्या म्हणाले की, माहितीच्या अधिकाराखाली मी कागदपत्रे मिळवली असून त्यात अनिल परब यांचे स्वत:चे विधान आहे की, त्यांनी स्वत:च्या रिसॉर्टमध्ये ६ कोटी रुपये खर्च केले आहेत.
२. ईडीने, तसेच आयकर विभागाने अनिल परब यांचा हा ‘रिसॉर्ट’ जप्त केला आहे. आयकर विभागाने ही संपत्ती बेनामी घोषित केली आहे, तर ईडीने पर्यावरण नियमांचा भंग करून काळा पैशांनी भ्रष्ट आणि फसवणूक करून बांधकाम केले असल्यामुळे हा रिसॉर्ट जप्त केला आहे.
३. ईडीने या संबंधात २० सरकारी अधिकारी, अनिल परब यांचे लाभार्थी, अकाऊंटंट साथीदार यांचीही विधाने आहेत. या साक्षीमुळे अनिल परब गुन्हेगार सिद्ध होणार आहेत.
माहितीच्या अधिकारात विभास साठे, जयराम देशपांडे, पारदुले आणि अन्य जणांची माहिती मिळाली आहे.