सातारा येथे ‘शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (आर्.टी.ई.) १ सहस्र ८२१ प्रवेश जागांसाठी ४ सहस्र ४८८ अर्ज
सातारा, ३० मार्च (वार्ता.) – शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राबवण्यात येणार्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आर्.टी.ई.) प्रवेश प्रक्रियेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात २१७ शाळांनी आर्.टी.ई.साठी नोंदणी केली असून १ सहस्र ८२१ प्रवेश जागांसाठी ४ सहस्र ४८८ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
बालकांना विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रतिवर्षी सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. यंदाही या उपक्रमाला जिल्ह्यातील सर्वच माध्यमांच्या शाळांतून चांगला प्रतिसाद लाभला आहे.
आर्.टी.ई.साठीची अनुदान रक्कम वेळेत जमा व्हावीआर्.टी.ई. कायद्यांतर्गत सातारा जिलह्यातील शाळा नेहमीच चांगला प्रतिसाद देतात; मात्र शासनाकडून आर्.टी.ई.साठीची अनुदानस्वरूपात येणारी रक्कम विलंबाने दिली जाते. यामुळे याचा परिणाम शाळेच्या व्यवस्थापनावरही होतो. सर्वच शाळांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे शासनानेही अनुदानाची रक्कम वेळेत शाळेकडे वर्ग केल्यास शाळेवरील आर्थिक ताण अल्प होण्यास साहाय्य होईल, अशी अपेक्षा शाळा व्यवस्थापन व्यक्त करत आहेत. |