‘म्हादई’ व्याघ्र संरक्षण क्षेत्र अधिसूचित करा ! – प्रा. राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ
पणजी, ३० मार्च (वार्ता.) – म्हादईच्या संरक्षणासाठीचा लढा अधिक भक्कम करण्यासाठी सरकारने म्हादई अभयारण्य हे व्याघ्र संरक्षण क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याची आवश्यकता आहे. व्याघ्र संरक्षण क्षेत्र अधिसूचित केल्यास त्या परिसरात रहाणार्या लोकांच्या हक्कांवर कोणतीही गदा येणार नाही, असे पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला ‘सेव्ह म्हादई-सेव्ह गोवा’चे राजन घाटे, प्राणीमित्र अमृत सिंह, जॉन मेंडोसा, अनिल लाड आदींची उपस्थिती होती.
Notify Mahadayi Wildlife Sanctuary as ‘Tiger Reserve’ demands environmentalist Rajendra Kerkar
(सौजन्य : News Matters)
प्रा. राजेंद्र केरकर पुढे म्हणाले,
‘‘म्हादई अभयारण्य परिसरात ज्या ठिकाणी मनुष्यवस्ती आहे, तो भाग वगळून अन्य परिसर हा व्याघ्र संरक्षण क्षेत्र म्हणून अधिसूचित केला जाऊ शकतो. तसेच ज्या ठिकाणी मोजकीच घरे आहेत, ती अन्य ठिकाणी स्थलांतरित केली जाऊ शकतात. म्हादई वाचवणे हे गोव्याचे प्राधान्य आहे. उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, छत्तीसगढ अशा राज्यांमध्ये व्याघ्र संरक्षण क्षेत्रे घोषित झालेली आहेत. यामुळे त्या परिसरात रहाणार्या लोकांचा मालकी हक्क किंवा अन्य अधिकार यांवर कुठलीही गदा आलेली नाही.’’ प्राणीमित्र अमृत सिंह म्हणाले, ‘‘राजकारणासाठी म्हादईचा बळी देऊ नये, अन्यथा त्याचे संपूर्ण गोव्याला परिणाम भोगावे लागतील.’’
♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦