श्रीरामभक्त लक्ष्मणाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
‘मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात भारतात दळणवळण बंदी असतांना दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा प्रसारित झाल्या होत्या. या भीषण आपत्काळातही प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अन् त्यांच्या भक्तांच्या चरित्रातील प्रसंग आणि त्यांच्या लीला पाहून अनेकांना मन:शांती लाभली अन् कोरोनाला सामोरे जाण्याचे आध्यात्मिक बळही मिळाले. हिंदु धर्मातील ग्रंथांमध्ये अध्यात्मशास्त्र असल्यामुळे ते कधीच कालबाह्य होत नाहीत. त्यामुळे त्यांचे पुन:पुन्हा पारायण केल्याने आत्मानंद आणि आत्मशांती यांची आजही अनुभूती येते. प्रभु श्रीराम हा भगवान विष्णूचा सातवा अवतार होता. कौसल्येचा पुत्र प्रभु श्रीराम, कैकयीचा पुत्र भरत आणि सुमित्रेचे लक्ष्मण अन् शत्रुघ्न हे दोन पुत्र, अशी ही चार भावंडे दशरथ राजाचे सुपुत्र होते. ‘लक्ष्मण’ हा प्रभु श्रीरामाचा अनुज (लहान भाऊ) होता. प्रभु श्रीरामाचे अनेक भक्त होऊन गेले. या लेखामध्ये आपण रामभक्त लक्ष्मणाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये पाहूया आणि ‘लक्ष्मणासारखी निस्सीम रामभक्ती आमच्या हृदयात निर्माण होऊ दे’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया.
१. ‘लक्ष्मण’ या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ
‘लक्ष्मण’ या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ पुढीलप्रमाणे आहे.
अ. ‘जो दैवी लक्षणांनी युक्त आहे’, असा.
आ. ज्याच्या मनाचे ‘लक्ष’ म्हणजे ‘ध्येय’ एकच आहे आणि ते, म्हणजे भगवंताची सेवारूपी भक्ती करणे
२. श्रीरामभक्त लक्ष्मणाची विविध गुणवैशिष्ट्ये
२ अ. परम बलशाली आणि पराक्रमी : प्रभु श्रीरामाप्रमाणे लक्ष्मणानेही ऋषि विश्वामित्र आणि ऋषि अगस्ती यांच्याकडून ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, पाशुपतास्त्र अशी असंख्य दिव्यास्त्रे प्राप्त केली होती. त्यामुळे तो प्रभु श्रीरामाप्रमाणेच परम बलशाली आणि पराक्रमी होता. ऋषि विश्वामित्र करत असलेल्या यज्ञामध्ये विघ्न निर्माण करणारे सुबाहू आणि मारिच या मायावी राक्षसांशी युद्ध करण्यासाठी लक्ष्मणाने या दिव्यास्त्रांचा उपयोग केला. त्याचप्रमाणे श्रीराम आणि रावण यांच्या घनघोर युद्धामध्ये लक्ष्मणाने रावणपुत्र अन् महामायावी सिद्धींनी युक्त असलेला इंद्रजित याच्याशी युद्ध करतांनाही लक्ष्मणाने या दिव्यास्त्रांचा उपयोग केला. जेव्हा इंद्रजित आणि लक्ष्मण यांच्यामध्ये निर्णायक युद्ध चालू होते, तेव्हा लक्ष्मणाने दैवी अस्त्रे, तपोबळ आणि भगवंताची भक्ती केल्यामुळे प्राप्त झालेले दैवीबळ यांच्या साहाय्याने इंद्रजिताला पराभूत करून त्याचा नाश केला. अशा प्रकारे लक्ष्मणाला सर्व प्रकारच्या असुरांवर विजय प्राप्त करण्याचे अभूतपूर्व सामर्थ्य प्राप्त झाले होते. यावरून रामभक्त लक्ष्मण परम बलशाली आणि पराक्रमी असल्याची ग्वाही मिळाली.
२ आ. भ्रातृप्रेमाचे मूर्तीमंत स्वरूप : लहानपणापासूनच प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांची जोडी होती. लक्ष्मण त्याच्या मोठ्या भावाला, म्हणजे श्रीरामाला सोडून कधीच जात नसे. त्यामुळे जेव्हा यज्ञात विघ्ने आणणार्या राक्षसांचा वध करण्यासाठी ऋषि विश्वामित्र श्रीरामाला घेऊन निघाले, तेव्हा लक्ष्मणही त्यांच्या समवेत गेला. त्याचबरोबर जेव्हा कैकयीच्या वचनाची पूर्ती करण्यासाठी श्रीराम वनवासात निघाला, तेव्हा लक्ष्मणही श्रीरामासमवेत निघाला. श्रीराम आणि रावण यांच्या युद्धात जेव्हा इंद्रजिताने नागपाश टाकला, तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण हे नागपाशात जखडले गेले आणि ते बेशुद्ध होऊन पडले. तेव्हा हनुमानाने वैकुंठात जाऊन विष्णुवाहन गरूडाला पृथ्वीवरील रणक्षेत्रावर पाचारण केले आणि गरूडाने श्रीराम अन् लक्ष्मण यांना नागपाशातून मुक्त केले. सुख आणि दु:ख अशा दोन्ही परिस्थितींमध्ये लक्ष्मणाने श्रीरामाची साथ दिली. ज्याप्रमाणे देहापासून त्याची सावली वेगळी करता येत नाही, त्याप्रमाणे कुणालाही प्रभु श्रीराम आणि त्याचा परम भक्त लक्ष्मण यांना एकमेकांपासून विलग करता आले नाही. अशा प्रकारे लक्ष्मण धर्मकर्तव्य आणि सत्कर्म करण्यात सतत लीन असे. त्यामुळे तो श्रीरामाच्या भ्रातृप्रेमाचे मूर्तीमंत स्वरूप होता.
२ इ. पराकोटीचे वैराग्य : कैकयीने दशरथ राजाकडे दोन वचने मागितली होती. पहिले वचन म्हणजे श्रीरामाच्या ऐवजी भरताचा राज्याभिषेक करणे आणि दुसरे वचन म्हणजे श्रीरामाला १४ वर्षांच्या वनवासाला पाठवणे. कैकेयीने केवळ श्रीरामाला वनवासात जाण्याची आज्ञा केली होती. लक्ष्मणाला अयोध्येच्या राजप्रसादात राहून राजकीय सुख आणि ऐश्वर्य सहजरित्या भोगता आले असते; परंतु लक्ष्मणाने तसे केले नाही. त्याच्यामध्ये पराकोटीचे वैराग्य असल्यामुळे त्याने त्याची धर्मपत्नी ‘उर्मिला’ हिला सोडून श्रीरामासह वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. एक राजपुत्र असून त्याने राजकीय पोषाख आणि अलंकार यांचा त्याग करून तपस्वी वेश परिधान केला आणि अनवाणीच वनवासात निघून गेला. त्याने वनवासात असतांना वनवासी जीवन सहजरित्या स्वीकारले आणि वनवासातील खडतर आयुष्याविषयी कधीच गार्हाणे केले नाही. त्याने प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांची नेहमी काळजी घेतली अन् त्यांची मनोभावे सेवा केली. पंचवटी येथे श्रीराम वास्तव्यास असतांना जेव्हा रावणाची बहीण शूर्पणखा हिने सुंदर युवतीचे रूप घेऊन लक्ष्मणासमोर विवाहाचा प्रस्ताव मांडला, तेव्हा लक्ष्मणाने तिला अजिबात प्रतिसाद दिला नाही; उलट जेव्हा तिने सीतेवर प्रहार केला, तेव्हा लक्ष्मणाने तात्काळ शूर्पणखेवर प्रहार करून तिच्या नाकाचा शेंडा छाटला. या सर्व उदाहरणांवरून लक्ष्मणाची परम वैरागीवृत्ती दिसून येते. (क्रमश:)
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.३.२०२३)