नामाचे ‘लिंग’ ठरवण्याच्या पद्धती आणि लिंग पालटल्यास नामांच्या रूपांत होणारे पालट
सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद़्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.
१७ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण नामांच्या तीन लिंगांविषयी माहिती पाहिली. आजच्या लेखात त्यापुढील भाग पाहू.
(लेखांक १८ – भाग २)
२. नामाचे ‘लिंग’ ठरवण्याच्या पद्धती
२ अ. पुरुषी गुणधर्म असलेली नामे पुल्लिगीं, तर स्त्रियांसारखे गुणधर्म असलेली नामे स्त्रीलिंगी लिहिणे : नामाचे लिंग ठरवण्याची पुढील पद्धत पहाण्यापूर्वी मागील लेखात पाहिलेली पहिली पद्धत अगदी थोडक्यात पुन्हा पाहू.
मोठा आकार, खूप मोठा आवाज, राकटपणा इत्यादी पुरुषी गुणधर्म ज्या नामांमधून व्यक्त होतात, ती पुल्लिगीं लिहिली जातात, उदा. ठोसा, डोंगर, समुद्र इत्यादी. याउलट लहान आकार, अल्प शक्ती, मृदुता इत्यादी स्त्रियांसारखे गुणधर्म ज्या नामांमधून व्यक्त होतात, ती स्त्रीलिंगी लिहिली जातात, उदा. ज्योत, डबी, पुस्तिका इत्यादी. या नियमाला अपवाद असणारे शब्द पुढे दिले आहेत.
तो हुंकार – ती किंकाळी, तो बिंदू – ती रेष इत्यादी.
२ आ. मराठी भाषेत बहुतांश नामांची लिंगे परंपरेनुसार ठरलेली असणे : ‘मराठी भाषेतील एखादे नाम पुल्लिगींच का लिहावे ?’ किंवा ‘एखादे नाम स्त्रीलिंगीच का लिहावे ?’, या संदर्भात वर दिलेला ‘२ अ’ हा एक ढोबळ नियम आहे. त्या नियमाला अपवाद असणारी नामेही त्याच्या खाली दिली आहेत. ‘एखाद्या नियमाला अपवाद असणे’, ही काही विशेष गोष्ट नाही; पण ‘२ अ’ या नियमाला आणखीही अनेक नामे अपवाद आहेत, ही वस्तूस्थिती आहे. एकंदर मराठी भाषेतील लिंगव्यवस्थेचा अभ्यास केला असता लक्षात येते की, ‘मराठी भाषेत कोणत्या नामाचे लिंग कोणते असावे ?’, हे ठरवणारे निश्चित नियम नाहीत. नामांची लिंगे ही मराठी भाषिकांच्या बोलण्या-लिहिण्यातून परंपरेने निश्चित झाली आणि टिकून राहिली आहेत. रूढीने निश्चित झालेल्या या लिंगव्यवस्थेमध्ये गेल्या सातशे-आठशे वर्षांत जाणवण्याएवढा मोठा पालट झालेला नाही. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या प्रांतांमध्ये बोली भाषेतील लिंगव्यवस्थेत थोडा भेद झाल्याचे आढळते; मात्र लिखित भाषेतील लिंगव्यवस्था बर्याच प्रमाणात जशीच्या तशी राहिल्याचे लक्षात येते. याचे सारे श्रेय वेगवेगळ्या प्रांतांतील दायित्वतेने लेखन करणारे लेखक, कवी, नाटककार आदींना द्यावे लागेल. त्यांनी लिहितांना लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचे भान ठेवले नसते, तर आज मराठीची पार दुर्दशा झाली असती.
३. लिंग दर्शवण्याची पद्धत
पुल्लिगं दर्शवण्यासाठी ‘हा’ आणि ‘तो’, स्त्रीलिंग दर्शवण्यासाठी ‘ही’ आणि ‘ती’ अन् नपुंसकलिंग दर्शवण्यासाठी ‘हे’ आणि ‘ते’ ही सर्वनामे वापरण्यात येतात. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
३ अ. पुल्लिगं दर्शवणारी शब्दरचना : तो अंकुश (श्री गणपतीच्या हातातील शस्त्र), तो अग्नी, तो सदरा, हा अभ्रा (उशीला घालायचे आच्छादन), हा गाल इत्यादी.
३ आ. स्त्रीलिंग दर्शवणारी शब्दरचना : ती गदा, ती भूमी, ती टोपी, ही उशी, ही भुवई इत्यादी.
३ इ. नपुंसकलिंग दर्शवणारी शब्दरचना : ते धनुष्य, ते पाणी, ते लुगडे, हे पांघरूण, हे बोट इत्यादी.
४. लिंगांमध्ये पालट झाल्यामुळे नामांच्या रूपांत होणारे पालट
४ अ. अ-कारांत पुल्लिगीं सजिवांच्या नामांची स्त्रीलिंगी रूपे ई-कारांत होणे : ‘राजकुमार’ हे अ-कारांत पुल्लिगीं नाम आहे. हे सजीव सृष्टीतील मनुष्य जातीतील एका घटकाला उद्देशून वापरले जाते. याचे स्त्रीलिंगी रूप ‘राजकुमारी’ असे ई-कारांत होते. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
४ आ. आ-कारांत पुल्लिगीं सजिवांच्या नामांची स्त्रीलिंगी रूपे ई-कारांत होणे : ‘नवशिका (एखादी गोष्ट नुकताच शिकू लागलेला)’ हे आ-कारांत पुल्लिगीं नाम आहे. हे सजीव सृष्टीतील मनुष्य जातीतील एका घटकाला उद्देशून वापरले जाते. याचे स्त्रीलिंगी रूप ‘नवशिकी’ असे ई-कारांत होते. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
(क्रमशः पुढच्या शुक्रवारी)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.३.२०२३)