असाध्य आणि गंभीर आजारातून सुखरूप बाहेर पडतांना रत्नागिरी येथील श्री. अशोक पाटील यांनी अनुभवलेली गुरुकृपा !
१. ‘हिमोग्लोबिन’ ४ पर्यंत आणि प्लेटलेट्स ७० सहस्र इतक्या न्यून झाल्यावर वेळेवर औषधोपचार मिळणे आणि गुरुकृपेने या कठीण प्रसंगात जीव वाचणे
‘सप्टेंबर २०१९ मध्ये मी गावी जातांना मला थोडा अशक्तपणा जाणवला. तेव्हा गणेशोत्सवाचा काळ होता. मी गावी आलो होतो. रुग्णालयात तपासण्या केल्यानंतर माझे ‘हिमोग्लोबिन’ ४ ग्रॅम प्रति ‘डेसिलीटर’ इतके न्यून झाले होते. (सर्वसाधारणपणे युवा पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन १४ ते १८ ग्रॅम प्रति ‘डेसिलीटर’ असते.) आणि ‘प्लेटलेट्स’सुद्धा ७० सहस्र इतक्या न्यून झाल्या होत्या. (सामान्य व्यक्तीच्या शरिरात दीड ते साडेचार लक्ष ‘प्लेटलेट्स’ प्रति ‘मायक्रोलीटर’ असतात.) त्या वेळी मला आधुनिक वैद्यांनी मोठ्या रुग्णालयात पाठवले. आम्ही रुग्णालयात वेळेवर पोचलो आणि माझ्यावर उपचार चालू झाले. गुरुकृपेने मी या प्रसंगातून सुखरूपपणे बाहेर आलो. त्या वेळी आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘हिमोग्लोबिन’ ४ ग्रॅम इतके खाली येणे, म्हणजे रुग्ण जगू शकत नाही.’’ गुरुकृपेनेच मी या प्रसंगातून सुखरूप बाहेर पडलो.
२. अर्धांगवात होऊनही लवकर बरे होणे
२ अ. अर्धांगवात होऊन शरीर लुळे पडणे, रुग्णालयात उपचार घेऊन आश्रमात आल्यावर चैतन्यदायी वातावरणामुळे बरे वाटणे : ‘२.८.२०२१ या दिवशी मी रत्नागिरीहून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आलो. २३.८.२०२१ या दिवशी भाजी चिरण्याची सेवा करत असतांना अकस्मात् ‘माझे हात आणि पाय यांतील शक्ती संपत आहे’, याची मला जाणीव झाली. मी सेवा थांबवून बाजूला जाऊन बसलो. थोडा वेळ विश्रांती घेऊन मी बांबोळी (गोवा) येथील रुग्णालयात गेलो. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर मला परत आश्रमात पाठवले. रुग्णालयातून आम्ही आश्रमाच्या चैतन्यदायी वातावरणात आल्यावर मला फार बरे वाटले. अर्धांगवात होऊनही (अर्धे शरीर लुळे पडूनही) मला त्याची फारशी झळ बसली नाही.
२ आ. अर्धांगवाताच्या रोगांवर आध्यात्मिक उपाय केल्यामुळे अडीच मासांत असाध्य रोग बरा होणे : मला सद़्गुरु गाडगीळकाकांकडून आध्यात्मिक उपायांसाठी मंत्रजप मिळाला होता. तो चालू केला आणि आताही करत आहे. त्यामुळे मला माझ्या प्रकृतीमध्ये पालट जाणवून बरे वाटत होते. प्रकृती हळूहळू सुधारत होती. साधारण एका आठवड्यातच मी हळूहळू चालू लागलो. आता अडीच मासांनंतर किरकोळ अशक्तपणा सोडला, तर ‘मला अर्धांगवात झाला होता’, असे कुणी म्हणणार नाही. जाणकारांच्या मते अर्धांगवात बरे व्हायला न्यूनतम ६ मास ते १ वर्ष लागते. गुरुकृपेने मी त्यातूनही फार लवकर बाहेर आलो.
वरील दोन्ही प्रसंग माझ्या मृत्यूशीसंबंधित होते; पण गुरुकृपेनेच मला त्यातून बाहेर पडता आले. त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– श्री. अशोक पाटील, पानवळ, रत्नागिरी. (२४.११.२०२१)
|