जानेवारी २०२४ मध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपूणे खुला होणार ! – नितीन गडकरी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची हवाई पहाणी !
रत्नागिरी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होऊन जानेवारी २०२४ मध्ये हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपूणे खुला होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची हवाई पहाणी केल्यानंतर ते येथील पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांच्या समवेत उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
मंत्री गडकरी पुढे म्हणाले की,
१. या प्रकल्पाची एकूण १० ‘पॅकेजेस’मध्ये (टप्प्यांमध्ये) विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २ पॅकेजेसचे (P-९, P-१०) जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे.
२. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ५ ‘पॅकेजेस’असून यापैकी २ पॅकेजेस (P-४, P-८) चे अनुक्रमे ९२ टक्के आणि ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. दोन पॅकेजेस (P-६, P-७) साठी नवीन कंत्राटदाराची नेमणूक करून बंद पडलेली कामे पुन्हा चालू करण्यात आली आहेत.
३. रायगड जिल्ह्यातील ३ ‘पॅकिजेस’पैकी २ पॅकेजेस (P-२, P-३)चे अनुक्रमे ९३ टक्के आणि ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पॅकेज (P-१) चे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल.
४. पनवेल-इंदापूर टप्प्यासाठी भूमी अधिग्रहण आणि पर्यावरण अनुमती यामुळेही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उशीर झाला आहे.
५. आता यातील सर्व गोष्टींची पूर्तता झाली असून कर्नाळा अभयारण्याच्या परिसरात उड्डाणपूल काढून पर्यावरणाची काळजी घेण्यात येत आहे.
६. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोव्यातील कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकास आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळेल.
१५ सहस्र कोटी रुपयांच्या नवीन ३ प्रकल्पांची घोषणाकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १५ सहस्र कोटी रुपयांच्या नवीन ३ प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये कळंबोली जंक्शन हा १ सहस्र २०० कोटी रुपयांचा प्रकल्प, पागोडे जंक्शन चौक ते ग्रीनफील्ड महामार्ग हा १ सहस्र २०० कोटी रुपयांचा प्रकल्प आणि मोर्चे करंजाडे हा जेएन्पीटीवरून जाणारा १३ सहस्र कोटी रुपयांचा देहलीला जोडणारा महामार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे. |