खोट्या चकमकीत पंतप्रधान मोदी यांना अडकवण्यासाठी माझ्यावर सीबीआयचा दबाव होता !
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा !
नवी देहली – केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार असतांना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना खोट्या चकमकीच्या प्रकरणी अडकवण्यासाठी माझ्यावर सीबीआय चौकशीच्या वेळी दबाव टाकण्यात आला होता, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केला. शहा त्या वेळी गुजरातचे गृहमंत्री होते. या कार्यक्रमात अमित शहा यांना विचारण्यात आले होते की, विरोधी पक्ष केंद्रशासनावर अन्वेषण यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत आहेत. त्यावर शहा यांनी वरील उत्तर दिले. तसेच ‘माझ्यावर दबाव टाकला जात असतांना त्या वेळी भाजपने कधी गदारोळ केला नव्हता’, असेही शहा म्हणाले.
हम सत्ता के दुरुपयोग के भुक्तभोगी हैं।
मेरे ऊपर फर्जी एनकाउंटर का फर्जी केस किया गया… अधिकारी बस एक ही बात बोलते थे कि और कुछ नहीं चाहिए, बस मोदी का नाम लेलो।
हमने यह लड़ाई कोर्ट में लड़ी…काले कपड़े पहन कर विरोध नहीं किया। pic.twitter.com/6HtED57wTd
— Amit Shah (@AmitShah) March 29, 2023
राहुल गांधी यांच्या प्रकरणात शहा म्हणाले की, राहुल गांधी हे एकमेव राजकारणी नाहीत ज्यांना न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांनी संसदेचे सदस्यत्व गमावले आहे. उच्च न्यायालयात आव्हान देण्याऐवजी राहुल गांधी याविषयावर गोंधळ घालत आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना उत्तरदायी धरत आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर आरोप करण्यापेक्षा उच्च न्यायालयात जाऊन खटला लढवावा. ‘शिक्षा थांबवता येत नाही’, अशा चुकीच्या गोष्टी काँग्रेस पसरवत आहे. न्यायालयाने मनाई केल्यास शिक्षेला स्थगिती दिली जाऊ शकते. तुम्हाला खासदार म्हणून रहायचे आहे आणि न्यायालयातही तुम्ही जाणार नाही, एवढा गर्व कुठून आला? यापूर्वी लालूप्रसाद यादव, जयललिता आणि राशिद अल्वी यांसारख्या १७ बड्या नेत्यांचे सभागृहाचे सदस्यत्व काँग्रेसच्या काळात गेले होते, तेव्हा कुणीही काळे कपडे घालून विरोध केला नाही.