महिलांनो, योग्य कृती करा !
‘महिलादिन’ ८ मार्च या दिवशी देशभरात उत्साहात साजरा झाला. जवळपास प्रत्येकच महिला संघटनांनी काहीतरी कार्यक्रम, समारंभ, सत्कार आदींचे आयोजन केले होते. हा भाग अत्यंत स्तुत्य होता. या सर्व कार्यक्रमांचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की, सांस्कृतिक कार्यक्रम, आधुनिक नृत्य, वेशभूषा स्पर्धा, संगीत खुर्ची यांसारख्या खेळांचे प्रमाण अधिक होते. प्रत्यक्षात महिलादिनानिमित्त कोणत्या कृती करायला हव्यात किंवा काय विचार करायला हवा ? हे समजणे आवश्यक आहे.
यामुळे ‘महिलांचे कर्तृत्व हे सांस्कृतिक कार्यक्रमांपुरतेच मर्यादित झाले आहे का ?’, असा विचार प्रकर्षाने मनात येतो. महाराष्ट्राचा किंबहुना भारताचा इतिहास पाहिल्यास राष्ट्रासाठी लहान वयात प्राण देणार्या महाराणी आणि क्रांतीकारी महिला यांचा वारसा आहे. याची जाणीव वाढणे आवश्यक आहे. महिला म्हणजे ‘शक्ती’ आहे. ती श्री दुर्गादेवीचे स्वरूप आहे; परंतु आज तिच्यावर होणारे अत्याचार, अन्याय, बलात्कार यांतून ती कुठे तरी आतून कमकुवत होत आहे, असे वाटते. तिच्या शीलावर संकट आलेले असतांना आणि अत्यंत असुरक्षित वातावरणात जगायला लागत असतांना याविषयी जागृती करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे, महिलांच्या आंतरिक शक्तीला प्रोत्साहन देणे, असे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्याची आवश्यकता आहे.
महिलांची असुरक्षितता पाहिल्यास या दिवशी केवळ मौजमजा करण्यासाठीच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे योग्य नाही. महिलांवर संकटे का येत आहेत ? यामध्ये महिलांचे कुठे चुकते ? त्यांना कोणत्या स्तरावर प्रशिक्षित करणे आवश्यक आहे, या विचारांचे मंथन होणे आवश्यक होते. टाळी एकाच हाताने वाजत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्ती महिलांवर अन्याय का करत आहेत ? महिला ही शक्तीचे स्वरूप असतांना आज ही शक्ती कार्यरत का होत नाही ? ही कार्यरत करण्यासाठी महिलांनी धर्मशिक्षण घेणे का आवश्यक आहे ? याचे प्रबोधन व्हायला हवे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. डीजेवर नृत्य करणे, मौजमजा करणे, ही आपली संस्कृती नव्हे. आनंद साजरा करण्यासमवेत स्वतःला सर्व अंगांनी सिद्ध करण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, धर्माचरण करून आध्यात्मिक शक्ती वाढवणे अपरिहार्य आहे. यासाठी सर्वच महिलांनी स्वतःसह समाजासाठी वेळ देऊन याप्रमाणे कृती करण्यासाठी वेळ द्यावा, असे वाटते.
– सौ. अनुभूती टवलारे, अमरावती