देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) महानंदा पाटील यांना श्रीरामाच्या संदर्भात आलेल्या विविध अनुभूती
१. सकाळी जाग आल्यावर पायातील पैंजण न दिसणे आणि तो पाय सीतेचा असल्याचे जाणवणे
‘२.४.२०२० या दिवशी सकाळी मी अंथरुणातून उठून बसले. तेव्हा मला उजव्या पायातील पैंजण दिसले नाही. त्या वेळी मला ‘माझा पाय सीतेचा आहे’, असे जाणवले. सीता अशोक वाटिकेत असतांना तिच्या शरिरावर अलंकार नव्हते. तिच्या पायांत पैंजण नव्हते. तेव्हा तिचा पाय जसा दिसत होता, तसाच मला माझा पाय जाणवला. मी ‘पैैंजण कुठे गेले ?’, हे शोधत असतांना पायजमा वर करून पाहिल्यावर ‘पैंजण वर सरकले आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
२. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीरामाच्या चित्राकडे एकटक पहाणे आणि ‘निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता’, हे वाक्य उच्चारल्यावर चेहर्यावरील काळे आवरण दूर झाले’, असे जाणवून भाव जागृत होणे
मी सकाळी उठून अंथरूणावर बसले असतांना दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीरामाच्या चित्राकडे एकटक पहात होते. तेव्हा ‘माझ्या चेहर्यावर काळे (त्रासदायक) आवरण आले आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मी ‘निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता’, हे वाक्य उच्चारताच माझ्या चेहर्यावरील काळे आवरण दूर झाले’, असे मला जाणवले. (पाण्यावर शेवाळ आलेले असते. ते बाजूला सारले असता शेवाळाच्या खाली असलेले पाणी दिसते. त्याचप्रमाणे माझ्या चेहर्यावरील आवरण दूर झाले.) ‘या वाक्यात सामर्थ्य आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझा भाव जागृत झाला. ‘श्रीरामाच्या चित्राकडे पहातच रहावे’, असे मला वाटत होते. ‘मला वैयक्तिक कामे आणि सेवा आहेत’, या विचाराने श्रीरामाच्या चरणांवर हात ठेवून नमस्कार करून मी उठले. मी सकाळपासून प्रत्येक कृती रामासाठीच करत होते.
३. श्रीरामाला तुळशीपत्र वहाणे आणि श्रीरामाच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉक्टरांचे रूप दिसून त्यांना लाडू भरवणे
त्यानंतर काही वेळाने मी आश्रमाच्या आवारात जाऊन श्रीरामासाठी तुळशीपत्र आणून ते स्वच्छ धुतले आणि श्रीरामाच्या चित्राला वाहिले. (माझ्या जवळ असलेल्या श्रीरामपंचायतनातील श्रीरामाच्या छायाचित्राला तुळशीपत्र वाहिले.) मी वाटीत परात्पर गुरु डॉक्टरांसाठी लाडू ठेवला होता. लाडूचा पहिला घास मी सूक्ष्मातून माझ्या श्रीरामाला भरवत होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर लाडू खात होते. माझ्या मनात त्यांचे रूप दिसत होते. तुळशीपत्र धुतलेले पाणी श्रीरामाच्या चरणांचे तीर्थ म्हणून मी ग्रहण केले.
४. स्वतःकडील जपमाळ शबरीची असून ‘ती रामनामाचा जप करत आहे’, असे जाणवणे
सकाळी ९ वाजता परात्पर गुरु डॉक्टरांचे लहान छायाचित्र हातात घेऊन मी त्यांना नमस्कार केला. मी डबीदेवता (जपमाळ ठेवण्याची डबी) आणि जपमाळदेवता यांना सांगितले, ‘आज रामनवमी आहे. तुम्ही श्रीरामाला नमस्कार करा.’ मी जपमाळदेवता आणि डबीदेवता यांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला स्पर्श करून ठेवले. मी ज्या वेळी जपमाळ हातात घेतली, त्या वेळी ‘ती जपमाळ शबरीची आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला वाटले, ‘ही श्रीरामाची माळ आहे आणि मला ती शबरीची कशी वाटत आहे ?’ तेव्हा मला जाणवले, ‘श्रीरामाची माळ आहे; पण ती शबरी जपते. त्यामुळे ती माळ शबरीची आहे’, असे जाणवते. शबरी श्रीरामाचा नामजप करते.’
५. ‘सकाळपासून प्रत्येक कृती श्रीरामासाठीच करत आहे’, असे जाणवणे
मी सकाळी उठल्यापासून श्रीरामाच्याच आठवणीत होते. मी वैयक्तिक आवरत असतांना ‘श्रीरामासाठीच सर्व करत आहे’, असा भाव माझ्या मनात होता. (उदा. केस विंचरतांना श्रीरामाच्या जटा बांधत आहे. कपाळावर कुंकू लावतांना श्रीरामाच्या कपाळावर कुमकुम तिलक लावत आहे. मी माझ्या कपाळावर श्रीरामाच्या नावाने कुंकू लावत आहे.) स्त्री जशी पतीच्या नावाने कुंकू लावते, तसे मी श्रीरामाचे नाम घेत कुंकू लावत होते. मी श्रीरामाचीच होते.
६. श्रीरामाच्या सगुण साकार रूपात श्रीरामरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मनोमन दर्शन होणे
२.४.२०२० या दिवशी भाववृद्धी सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘रामाच्या सगुण साकार रूपात, म्हणजेच श्रीरामरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मनोमन दर्शन घेऊया.’’ त्या वेळी मी डोळे मिटले असता मला श्रीरामाचे मुख दिसले. तेव्हा मला जाणवले, ‘आज सकाळी मी लाडूचा पहिला घास परात्पर गुरु डॉक्टरांना भरवला, तो श्रीरामाने ग्रहण केला.’ त्या वेळी श्रीराम मला म्हणत असल्याचे जाणवले, ‘परात्पर गुरु डॉक्टर श्रीराम आहेत’, असा तुझा भाव आहे.’
७. स्वतःचा चेहरा श्रीरामाचे मुख वाटणे
त्या वेळी मी काही क्षण डोळे बंद केले. माझा चेहरा हा रामाचे मुख होते. श्रीरामाच्या गळ्यात फुलांचा हार होता. रामाचे रूप, म्हणजे छातीपर्यंत दिसणारा माझा चेहरा होता. तेव्हा श्रीरामाच्या नेत्रांतून सूक्ष्मातून अश्रूधारा वहात होत्या. ते अश्रू रामासाठीच होते. ते रामासाठीच, म्हणजे मी रामासाठी ढाळत असलेले अश्रू, हे रामाला कळले. रामानेे मला दाखवून दिले, ‘तुला मला भेटण्याची तळमळ आहे. तू ढाळत असलेले अश्रू मला कळत आहेत. तेच अश्रू माझ्या डोळ्यांत साकार झाले आहेत. जसजशी तुझी साधना होईल, तसतसा मी तुला दर्शन देण्यासाठी जवळ येईन.’
८. नामजप करत असतांना श्रीरामाचे अस्तित्व जाणवणे
५.४.२०२० या दिवशी संध्याकाळी मी नामजप करण्यासाठी बसले होते. (त्या वेळी आश्रमातील साधक प्रत्यक्षात जपाला बसले होते.) त्या वेळी सेवेच्या पटलाच्या पुढे मला सूक्ष्मातून श्रीरामाचे अस्तित्व जाणवले. मला सूक्ष्मातून श्रीरामाचा शेला आणि पितांबर दिसत होता. श्रीराम भूमीपासून ४ फूट वर अधांतरी उभा होता. तेव्हा मला श्रीरामाची हालचाल जाणवली.
त्याच दिवशी मी ध्यानमंदिरात बसून रात्री ११ वाजता ही सूत्रे लिहिली.
– सुश्री (कु.) महानंदा पाटील (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.४.२०२०)
|