डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे रिक्शाचालकाकडून प्रवाशावर आक्रमण
ठाणे, २९ मार्च (वार्ता.) – डोंबिवली पूर्व भागातील इंदिरा चौकात २७ मार्चच्या रात्री एका रिक्शाचालकाने प्रवाशाला लाथाबुक्के आणि बांबू यांच्या काठीने मारहाण केली. वाढीव भाडे देण्यास प्रवाशाने नकार दिल्याने रिक्शाचालकाने हा प्रकार केला. चौकातील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये हा मारहाणीचा प्रकार कैद झाला आहे. ‘कल्याण-डोंबिवलीत रिक्शाचालकांची मनमानी वाढली आहे’, अशी चर्चा यामुळे चालू आहे. याच कारणावरून बर्याच रिक्शाचालकांचे परवानेही रहित झाले आहेत.
काही रिक्शाचालक अल्पवयीन आहेत. काही गणवेश न घालता प्रवासी वाहतूक करत आहेत. रिक्शा वाहनतळावर उभे राहून प्रवासी वाहतूक न करता वर्दळीचे रस्ते, रेल्वेस्थानकांची प्रवेशद्वारे येथे थांबून हे रिक्शाचालक प्रवासी वाहतूक करतात. प्रादेशिक परिवहन विभागाने अशा रिक्शाचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.