समर्थ रामदासस्वामींचे भिक्षा मागण्याविषयीचे नियम
३० मार्च २०२३ या दिवशी ‘समर्थ रामदासस्वामी जयंती’ आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
‘भिक्षा मागणे’, हा समर्थ संप्रदायाचा आत्मा आहे. माणसे जर गोळा करायची असतील, तर महंतांना कष्ट केले पाहिजेत. संघटनेत नवनवीन माणसे सामील झाली पाहिजेत. त्यासाठी ‘नित्य नूतन हिंडावे । धुंडावे भक्त प्रेमळ ।’, असे समर्थ सांगतात. भिक्षेच्या निमित्ताने सतत फिरत रहावे आणि नवनवीन भक्तांचा शोध घ्यावा. अनेकांचा असा गैरसमज आहे की, भिक्षा म्हणजे आळशी आणि पोटभरू लोकांची धर्माने लावलेली व्यवस्था; परंतु ‘भिक्षा’ आणि ‘भीक’ यांमध्ये भेद आहे.
समर्थ रामदासस्वामी यांची झोळी ही राष्ट्रीय झोळी असून एका समाजाचे संघटन आणि एका राज्याची निर्मिती करण्याची क्षमता या झोळीमध्ये आहे. त्यासाठी समर्थांचे भिक्षेचे नियम समजावून घेणे आवश्यक आहे. ते म्हणतात –
१. ओळखीच्या लोकांकडे पुन्हा पुन्हा भिक्षा मागू नये.
२. भिक्षेसाठी एका कुटुंबावर किंवा एकाच गावावर अवलंबून राहू नये.
३. प्रतिदिन एकाच श्रीमंत कुटुंबातून भरपूर भिक्षा न आणता ५ वेगवेगळ्या कुटुंबांतून थोडी थोडी भिक्षा आणावी, म्हणजे एकाच कुटुंबावर ताण पडणार नाही.
४. एखाद्या कुटुंबाने भरपूर पदार्थ वाढण्यासाठी आणल्यास त्यातील थोडेच घ्यावे आणि बाकीचे परत करावेत.
५. महंतांनी अन्नछत्रात जेवण करू नये.
६. वार लावून निवडक घरांमध्येच जेवणाची सोय करू नये. थोडक्यात समर्थांच्या मते भिक्षा हे पोट भरण्याचे साधन नसून माणसे गोळा करण्याचा मार्ग आहे.
७. ज्या व्यक्तीला पूर्णवेळ समाजसेवा करायची आहे, त्याने पोटा-पाण्यासाठी नोकरी न करता समाजावर अवलंबून रहावे. त्याचे कार्य लक्षात घेऊन समाजाने अशा व्यक्तीला सांभाळावे.
म. गांधी बॅरिस्टर होऊन भारतात परतल्यावर गोपाळ कृष्ण गोखले त्यांना म्हणाले, ‘‘प्रपंच चालण्यासाठी तुम्ही वकिली करू नका. तुम्ही भारतीय स्वातंत्र्यासाठी समाजाची वकिली करा. समाज तुमच्या कुटुंबाची काळजी घेईल.’’ समर्थांनी भिक्षेद्वारा सामुदायिक संपत्तीची संकल्पना पुढे आणली.’
लेखक : अजय भोसरेकर, सदस्य, वीज ग्राहक गार्हाणे मंच, पुणे प्रभाग) आणि सदस्य कार्यकर्ता, अखिल भारतीय ग्राहक पंचायत